मुंबई- अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. ज्या सोसायटीत ती राहात होती तिथल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांसोबत ही अभिनेत्री भांडायची, खेळणाऱ्या मुलांनाही धमकवायची. सोसायटीच्या चेअरमनला धमकवल्यामुळे तिच्या हातात बेड्या पडल्या आहेत. मात्र तिचा हा वात्रटपणा पहिल्यांदा नाही.
पायल आणि वाद यांचे जणू समिकरणच आहे. यापूर्वी तिने राजस्थान पोलिसांचा पाहुणचार घेतला आहे. नेहरुंवर केलेल्या अभद्र कॉमेंट्समुळे तिला तुरुंगाची हवा खावी लागली होती.
शिवाजी महाराजांबद्दलचे वादग्रस्त विधान आणि नंतर मागितली होती माफी
अभिनेत्री पायल रोहतगीला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले एक विधान खूपच जड गेले होते. तिने महाराजांबद्दलचे एक आक्षेपार्ह ट्विट केले होते.
पायल हिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शेतकरी कुटुंबातील शूद्र वर्णात झाला होता. यज्ञोपवित संस्कार आणि पत्नीबरोबर पुनर्विवाह केल्यामुळे त्यांना क्षत्रिय बनवण्यात आले होते, की ज्यामुळे त्यांचा राज्याभिषेक होऊ शकेल. अशा प्रकारे लोक एका वर्णातून दुसऱ्या वर्णात बळाच्या जोरावर जाऊ शकतात. हा जातीयवाद नाही?''
पायलच्या या ट्वविटनंतर तिच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. त्यानंतर तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आणि आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. व्हिडिओमध्ये पायल म्हणाली, "माझ्या साध्या प्रश्नाचा गैरसमज झाला आहे. अगदी मीदेखील एका महान राजाची पूजा करते. मी काही वाचन केले आणि एक माहिती समोर आली जी मी सर्वांसमोर ठेवली होती. पण सोशल मीडिया पूर्णपणे ट्रॉल्सने भरलेला आहे."
नेहरु आणि इंदिरा गांधीबद्दलही केले होते वादग्रस्त विधान
पायल रोहतगीने २१ सप्टेंबर २०१९ सोशल मीडियावर एक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत तिने स्वातंत्र्य सेनानी मोतीलाल नेहरु आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. पायलाच्या विरोधात काँग्रेसच्या चर्मेश शर्मा यांनी तक्रार दाखल केली होती.
पायलने अंगावर घेतलेले वाद
अभिनेत्री पायल रोहतगी आपल्या वक्तव्यांमुळे बर्याचदा चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या ट्वीटमुळे ती बऱ्याचदा चर्चेच्या केंद्रस्थानी राहते. आतापर्यंत तिला अनेकदा ट्रोलचा सामना करावा लागतो. सती प्रथेचे समर्थन करणे, नोबेल पुरस्कार विजेते मलाला यूसुफजईला शिवीगाळ करणे, वीर शिवाजी महाराजांच्या जातीबद्दल प्रश्न विचारणे, कलाम ३७० बद्दल वादग्रस्त विधान करणे, फूड अॅप झोमॅटोला धर्मनिरपेक्ष म्हणून संबोधणे अशा अनेक वादांमध्ये पायलचे नाव गुंतले आहे
हेही वाचा - अभिनेत्री पायलच्या हातात पोलिसांनी ठोकल्या बेड्या, शिवीगाळ करणे पडले महागात