मुंबई - गेले जवळपास संपूर्ण वर्ष कोरोनामुळे वाया गेलं. देशाची आर्थिक घडी विस्कटली आणि साहजिकच तिथल्या नागरिकांचीही. लॉकडाऊनमुळे सर्वांचेच सर्व कामकाज ठप्प झाले होते व यात हातावर पोट असणाऱ्यांचे सर्वात जास्त हाल झाले होते. गेले वर्ष सरता सरता सामान्यजनांना एक आशेचा किरण दिसू लागला होता, कारण कोरोनावर मात करीत सर्वच व्यवसाय सुरु झाले होते. मनोरंजनसृष्टीही पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली होती. शुटिंग्स सुरु झाली होती आणि सिनेमा हॉल्समध्ये चित्रपट प्रदर्शनही होऊ लागले होते. परंतु या सगळ्याला नजर लागली असं म्हणावं लागेल. कारण कोरोना विषाणू पुन्हा डोके वर काढू लागला असून कोव्हीड-१९ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यात महाराष्ट्रात सर्वात जास्त, म्हणजे देशाच्या रुग्णसंख्येतील निम्म्याहून अधिक, रुग्ण सापडत असून परिसथिती गंभीर आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या वावड्या उठत आहेत.
खरंतर कुणालाही लॉकडाऊन नकोय. परंतु कोरोना रुग्णसंख्या बघता तो पर्याय निवडला जाऊ शकतो अशी माहिती नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिली. मनोरंजनसृष्टीत बहुतांश कामगार ‘डेली वेज’ वर काम करतात आणि त्यांची गोची होण्याची संभावना FWICE चे अशोक पंडित यांनी व्यक्त केली. ही संस्था सिनेव्यवसायातील कामगार, कलाकार, टेक्निशियन्स आदी सर्वांच्या कल्याणासाठी कार्यरत असून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी लढत असते. सद्यस्थिती पाहता लॉकडाऊन मुळे ‘डेली वेज’ कामगारांवर पुन्हा एकदा उपासमारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. मनोरंजनसृष्टीतील इतरही लोकांना याचा जबर फटका बसू शकतो. त्यामुळे FWICE ने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कृपया पुन्हा लॉकडाऊन लावू नये असे पत्राद्वारे कळविले आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून करमणूक उद्योगावर कुलूप लावू नये, असे आवाहन केले आहे. त्यांनी नमूद केले आहे की टीव्ही आणि चित्रपटसृष्टीवर अवलंबून असणाऱ्यांसाठी, त्यांच्या उपजीविकेवर आणखी एक लॉकडाऊन पुन्हा बेरोजगारीची परिस्थिती निर्माण करेल. एफडब्ल्यूआयसीईने हे पत्र त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही शेअर केले आहे.
हेही वाचा - 'चली चली' या 'थलायवी'मधील गाण्यासाठी कंगना रणौतने केली होती कठोर मेहनत