मुंबई -बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे दोन्ही भाऊ एहसान खान आणि अस्लम खान यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. एहसान यांचे वय 90 असून अस्लम यांचे वय 88 आहे. यांच्यापैकी अस्लम खान यांचे आज सकाळी रुग्णालयात निधन झाले. ते दिलीप कुमार यांचे कनिष्ठ बंधू होते.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या भावाचा लीलावती रुग्णालयात कोरोना संसर्गाने मृत्यू - Bollywood corona news
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे कनिष्ठ बंधू अस्लम खान (वय 88) यांचे आज सकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच, त्यांना दीर्घकालीन आजारही होते.
![ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या भावाचा लीलावती रुग्णालयात कोरोना संसर्गाने मृत्यू दिलीप कुमार न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8500406-thumbnail-3x2-dilip.jpg)
या दोघांना अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्यांना शनिवारी रात्री तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे दोन्ही भाऊ दिलीप कुमार यांच्यासोबत न राहता आपापल्या कुटुंबासह वेगळे राहतात. त्यांना काल रात्री रुग्णालयात दाखल केल्यानंतर सध्या डॉक्टर जलील पारकर यांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. दोघांनाही श्वास घ्यायला त्रास असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होते. हे दोघेही पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. यांच्यापैकी अस्लम यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांना मधुमेह, अतिताण-तणावाचा त्रास होता. याशिवाय, हृदयाच्या धमन्या अरुंद झाल्यामुळे त्यांच्या हृदयाच्या स्नायूंची ताकद कमी झाली होती (ischaemic heart disease).
मार्च महिन्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांनी स्वतः आयसोलेशनमध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला होता. प्रकृती साथ देत नसल्यामुळे दिलीप कुमार नियमित उपचार घेत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढू लागल्यानंतर दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी सायरा बानो हे दोघेही संपूर्णपणे विलगीकरणात राहत आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सायरा शक्य ती सारी काळजी घेत असल्याचे ट्विट करून त्यांनी आपल्या चाहत्यांना सांगितले होते.