पुणे- 'आर्टिकल १५' आणि 'सत्यकथा' हे दोन चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी दिला आहे. 'आर्टिकल १५' हा सिनेमा बदायू येथे घडलेल्या एका दुर्दैवी प्रकरणावर आधारित असून या चित्रपटातून काही सवर्ण जातींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याची माहिती असल्याचे दवे म्हणाले.
समानतेचा आग्रह धरणारे घटनेतील १५ कलम आणि या चित्रपटाचा काही संबंध आहे का? हे तपासणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रदर्शित होण्याआधी हा चित्रपट सामाजिक संघटना अथवा वकील यांना दाखवावा आणि त्यानंतरच प्रदर्शित करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दुसरा सत्यकथा नावाचा चित्रपटही रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. या चित्रपटात ब्राह्मण समाजाविषयी गलिच्छ शब्द वापरले आहेत. कोणताही ऐतिहासिक पुरावा आणि आधार नसतानासुद्धा केवळ जातीय तेढ निर्माण करण्यासाठी चित्रपटातील कलाकारांच्या तोंडी अनेक चुकीची वाक्ये घालण्यात आली आहेत. ती त्वरित काढण्यात यावी, अन्यथा हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही आनंद दवे यांनी दिला.
'आर्टिकल १५' आणि 'सत्यकथा' चित्रपटाला ब्राम्हण महासंघाचा विरोध या दोन्ही चित्रपटांना विरोध दर्शविण्यासाठी आम्ही सर्व कायदेशीर बाबी तपासून या चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शक यांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. हे चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी जे जे करावे लागेल ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही आनंद दवे यांनी सांगितले.