नवी दिल्ली- जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभिनेत्री दीपिका पदुकोणने भेट दिली. यावेळी कन्हैया कुमारही जेएनयूमध्ये उपस्थित होता. यावेळी कन्हैयाने जोरदार घोषणाबाजी केली होती.
कन्हैयाने यावेळी विद्यार्थ्यांसमोर भाषण केले. गुंडांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेली विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयेशी घोषदेखील उपस्थित होती. आयेशीची दीपिकाने विचारपूस केली. दीपिका पदुकोण आगामी 'छपाक' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिल्लीत आली होती.
#BoycottChapaak हॅशटॅग झाला ट्रेंड
दीपिका पदुकोण जेएनयूमध्ये पोहोचल्यामुळे सोशल मीडियावर छपाक चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. काहीजण 'छपाक'वर बहिष्कार करण्याच्या प्रचाराला लागले आहेत.
एकाने दीपिकाच्या जेएनयू पोहोचण्याचा विरोध करीत ट्विट करत TukdeTukdeGang शब्द वापरलाय. अफजल गुरु आणि टुकडे टुकडे गँग यांचे दीपिकाने समर्थन केले. तुम्ही जर दीपिकाच्या चित्रपटावर बहिष्कार करणार असाल तर रिट्विट करा.
भाजप नेता इंदु तिवारी यांनीही ट्विट करीत दीपिकाला विरोध केलाय. याच प्रकारच्या भूमिकेमुळे शाहरूख खान, आमिर खानचे करिअर संपले. त्याच वाटेवरून दीपिका जात असल्याचे एकाने म्हटले आहे.