मुंबई-बॉलिवूडची बदनामी करणाऱ्या बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात द फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया, द सिने अँड टिव्ही आर्टिस्ट असोसिएशन, इंडियन फिल्म अँड टीव्ही प्रोड्युसर्स कौन्सिल, स्क्रीन रायरटर्स असोसिएशन, शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. अर्णब गोस्वामी, नविका कुमार, राहुल शिवशंकर, प्रदीप भंडारी यांच्यासह दोन मीडिया हाऊसेस विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
न्यूज चॅनल्सविरोधात बॉलिवूड एकवटले.. शाहरुख, सलमान, आमिरसह मनोरंजन संघटना 'या' सहाजणांविरोधात कोर्टात - Indian Film and TV Producers Council news
बॉलिवूडची प्रतिमा मलीन करण्याचे काम करणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात द फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियासह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

या सगळ्यांनी गेल्या दोन महिन्यात बॉलिवूडची प्रतिमा मलीन करण्याचे काम केले असल्याची तक्रार या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रॉडक्शन हाऊसेसनी यांच्या विरोधात बेजबाबदार बातमीदारी केल्याचा ठपका ठेवत दिल्ली उच्च न्याचालयात या चार जणांविरोधात आणि दोन चॅनल्स विरोधात याचिका दाखल केली आहे. यामध्ये शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अजय देवगण, करण जोहर, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर, झोया अख्तर यांच्यासह महत्त्वाच्या प्रॉडक्शन हाऊसेसचा समावेश आहे. बॉलिवूडमधल्या कलाकारांविरोधात डर्ट, फिल्थ, स्कम, ड्रगीज अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या सगळ्यामुळे बॉलिवूडची बदनामी झाली असून हे शब्द सिनेसृष्टीसाठी अपमानजनक आहेत असेही या याचिकेत म्हटले आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर काही मीडिया हाऊसेसने बॉलीवुडवर ड्रग्सचा धंधा करत असल्याचा आरोप लावत बॉलीवुड देशातली सर्वात वाईट इंडस्ट्री असल्याचे म्हटले होते. बॉलीवुड सगळेच अपराधी आहेत अशाप्रकारची रिपोर्टिंग काही पत्रकारांकडून करण्यात आली होती.