मुंबई - बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन हे त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासह कार्यप्रणासाठीही प्रसिद्ध आहेत. आपले काम हीच पूजा असे त्यांचे कार्याचे मंत्र आहे आणि हाच मंत्र अभिषेक बच्चनला प्रेरित करतो. बिग बी यांनी आपल्या कामाबाबत एक प्रेरणादायी पोस्ट ट्विटरद्वारे शेअर केली होती. तीच पोस्ट शेअर करत अभिषेकने बिग बींचे काम हे त्याच्यासाठी प्रेरणा ठरत असल्याचे म्हटले आहे.
काम पूजा आहे, उत्सव साजरा केला जातो; मात्र, दररोज काम करत राहण्याची इच्छा असते. काम जीवनाचे सार आहे, आपला उद्धार आहे. आळसपणाला घालवण्याचे शस्त्र आहे, त्यातील निरंतरता तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल. वाटेत येणाऱ्या प्रत्येक गतिरोधकाचा सामना करा आणि आपल्या इच्छाशक्तींच्या जोरावर ते साध्य करून दाखवा, अशाप्रकारची पोस्ट अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टला अभिषेक बच्चनने शेअर करत 'हेच माझ्यासाठी प्रेरणास्रोत' असल्याचे म्हटले आहे.
अभिषेक काही दिवसांपूर्वीच 'ब्रीद : इन द शॅडो' प्रेक्षकांपुढे आला होता. ही बेवसिरीज अमेझॉनच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अभिषेकचे 'द बिग बुल', 'ल्युडो' हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.