मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन 'राधे श्याम'च्या टीममध्ये सामील होत आहेत. प्रभास आणि पूजा हेगडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे निवेदन अमिताभ करणार आहेत. अमिताभ त्याच्या आयकॉनिक भारदस्त आवाजामुळे चित्रपट अधिक परिणामकारक बनेल असा विश्वास निर्मात्यांना वाटतो.
राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित बहु-भाषिक चित्रपट 'राध्ये श्याम'ची प्रेमकथा 1970 च्या दशकात युरोपमध्ये रचली गेली आहे. यामध्ये प्रभास एका हस्तरेखा जाणकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग इटली, जॉर्जिया आणि हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
या घडामोडीबद्दल बोलताना दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार म्हणतात, "हा चित्रपट 1970 च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे आणि भव्य प्रमाणावर याची निर्मिती करण्यात आली आहे. आम्हाला अशा आवाजाची गरज होती जो देशातील प्रत्येकाला ओळखीचा असेल. यासाठी श्रीमान अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त चांगले कोण असेल. त्यांचा आवाज प्रत्येकजण ओळखतो आणि त्यावर प्रेम करतो. ते राधे श्यामचे निवेदक म्हणून मिळाल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे."
गुलशन कुमार आणि टी-सीरीज यांची निर्मिती असलेला 'राधे श्याम' हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -रश्मिका मंदान्नासोबत लग्न केल्याच्या बातम्यांवर विजय देवरकोंडाने दिली प्रतिक्रिया