मुंबई - अमिताभ बच्चन यांचा प्रचंड गाजलेला डॉन हा चित्रपट ४२ वर्षापूर्वी आजच्या दिवशी रिलीज झाला होता. या चित्रपटाचे शीर्षक वितरकांना कसे खटकले होते, याचा किस्सा अमिताभ यांनी सांगितला आहे.
अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये चंद्रा बारोट यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि त्याकाळातील सर्वात हिट लेखक जोडी सलीम जावेद यांनी लिहिलेल्या डॉनबद्दल लिहिलंय. यात अमिताभसह झीनत अमान, प्राण, इफ्तिकार आणि ओम शिवपुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
''जेव्हा चंद्रा आणि सलीम जावेद यांनी या चित्रपटाची घोषणा केली तेव्हा कोणीही वितरक हे शीर्षक स्वीकारायला तयार नव्हता. त्याकाळात डॉन नावाचा लोकप्रिय अंडरवेअर ब्रँड होता...यासारखे हे नाव वाटत असल्याचे त्यांना वाटत होते. त्याकाळी गॉडफादर या नावाला सिनेवर्तुळात स्थान होते. पण डॉन हा शब्द त्याकाळात लोकांना परिचित नव्हता.,'' असे बच्चन यांनी लिहिलंय.
परंतु सिनेमाला आणि त्याच्या संगिताला लोकांनी जो प्रतिसाद दिला त्याला तोड नव्हती. आज सकाळी जावेद साहेबांनी एसएमएस करून डॉनला ४२ वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितल्याचाही उल्लेख बच्चन यांनी केलाय.
अमिताभ यांनी या चित्रपटातील काही फोटो शेअर कलेले आहेत. यात 'खाईके पान बनारसवाला' या गाण्याच्या सेटवरीलही एक फोटो आहे. या गाण्याचा एक किस्साही बच्चन यांनी सांगितला आहे.
''बराच काळ मेहबूब स्टुडिओत या सिनेमाचे शूटिंग केल्यानंतर दुसऱ्या एका सिनेमाचे शूटिंग श्रीनंगर काश्मिरमध्ये करीत होतो. त्यावेळी सलीम जावेद यांची तार आली. यात त्यांनी लिहिले होते की एका शूटिंगची कच्ची फिल्म पाहात असताना एक डुप्लिकेट कॅरेक्टर पान खाताना दिसले होते. त्यावरून खाईके पान या गाण्याचा विचार त्यांचा मनात आला.''
"शूट संपल्यानंतर चंद्रा यांनी मनोजजी यांना हा चित्रपट दाखविला आणि त्यांनी उत्तरार्धात एक गाणे असावे अशी सूचना केली अशा प्रकारे हे गाण्याचे क्षण तयार झाले'', असे बच्चन यांनी म्हटलंय.
त्याकाळात अमिताभ सिनेमाच्या शूटिंगमध्ये प्रचंड गुंतलेले होते. एका दिवसामध्ये तीन तीन शूटिंग सेटवर काम चालून असायचे. खाईके पान बनारसवाला हे गाणे जेव्हा होणार होते तेव्हाही ते एका सेटवरुन परतले होते. या गाण्याच्या शूटिंगसाठी भूलीचे इंजेक्शन घ्यावे लागल्याचे त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.