मुंबई- भारत - चीन सीमेवरील तणावातून भारताच्या २० जवानांना वीरमरण आले आहे. लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली होती. या घटनेवर बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनने दुःख व्यक्त केले आहे. लोक सध्या अशांततेच्या परिस्थितीला तोंड देत आहेत. त्यातच लडाखमध्ये झालेल्या भारतीय सैन्याच्या जीवितहानीमुळे दु:ख झाल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे.
सीमेवर भारतीय जवान धैर्याने उभा असल्याचे सांगत हृतिकने देशाच्या सीमेचे रक्षण करताना वीरमरण आलेल्या जवानांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.
भारतीय सैन्यदलाला पाठिंबा दर्शविताना ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर म्हटले आहे, "भारतीय सेना की जय. जय हिंद." याद्वारे त्यांनी वीरमरण प्राप्त जवानांना आदरांजली वाहिली आहे.
हेही वाचा - सलमानच्या कुटुंबीयांनी माझं 'वाटोळं' केलं, 'दबंग' दिग्दर्शकाचा आरोप
सीमेवरील तणावामुळे खूप दु:खी झाल्याचे सांगत अक्षय कुमार याने म्हटले आहे, "गलवान व्हॅलीतील आमच्या बहाद्दरांच्या मृत्यूमुळे अतिव दु: ख झाले. देशाच्या अनमोल सेवेबद्दल आम्ही कायमचे त्यांचे ऋणी असल्याचे सांगत त्याने या सैनिकांच्या कुटुंबीयांबद्दल सहानभूती व्यक्त केली आहे."
सैन्य आणि हुतात्मा जवानांना सलाम करीत अमिताभ बच्चन यांनीही लता मंगेशकरांनी गायलेले 'ए मेरे वतन के लोगों' या गीताच्या काही ओळी ट्विट करत आदरांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी, आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिल्याच्या भावना बच्चन यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच अभिनेता तुषार कपूर यानेही "आमच्या नायकांना, सीमेवरील सर्व शूर सैनिकांना अधिक बळ मिळो! आमच्या शहिदांना श्रद्धांजली!" असे ट्विट करून हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली आहे.
लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये १५ जून रोजी संध्याकाळी आणि रात्री चीनचा हिंसक चेहरा-समोर आला. ही परिस्थिती टाळता आली असती. चीनने उच्च स्तरावरील कराराचे काटेकोरपणे पालन केल्यास हे घडले नसते. या चकमकीत २० सैनिक ठार झाल्याची आणि १७ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे