घाबरवत हसवायला आणि हसवत घाबरावयाला 'भूल भुलैया २' येतोय येत्या १९ नोव्हेंबरला! - 'भूल भुलैया २' चित्रपटाच्यासुद्धा प्रदर्शनाची तारीख पक्की
'भूल भुलैया २' हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या १९ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. खुर्चीला खिळवून ठेवणारी कथा आणि पोट दुखेपर्यंत हसविणारे संवाद यात पाहायला मिळतील अशी प्रेक्षकांना आशा आहे. भूल भुलैया २ मध्ये कार्तिक आर्यनसोबत कियारा अडवाणी आणि तबू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
मुंबई- सध्या हिंदी चित्रपटांची प्रदर्शन तारीख जाहीर करण्यात अहमहमिका लागलेली दिसून येते. गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेक चित्रपटांची, प्रदर्शन आणि शूटिंगची, वेळापत्रकं बदलावी लागली. अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होते. परंतु चित्रपटगृहांना बंद ठेवणे अनिवार्य झाल्यामुळे त्यांच्या मेकर्सना हातावर हात धरून बसावे लागले होते. आता थिएटर्स सुरू झाल्यामुळे निर्मात्यांकडून 'चांगल्या' तारखा पटकावण्याची सुरुवात झाली आहे.
'भूल भुलैया' याचा बहुप्रतिक्षित सिक्वेलसुद्धा वरच्या गोष्टींत मोडतो. कार्तिक आर्यन अभिनित आणि अनीस बाझमी दिग्दर्शित 'भूल भुलैय्या २' ने १९ नोव्हेंबर २०२१ चा मुहूर्त पकडला आहे.