भारतीय चित्रपटसृष्टी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलीय. जागतिक स्तरावरसुद्धा सिनेसृष्टी आपले अस्तित्व दर्शवू लागली आहे. गेल्या वर्षी फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय कान चित्रपट महोत्सव संपन्न होऊ शकला नाही आणि यावर्षीच्या महोत्सवावरसुद्धा मळभ होतं. परंतु या वर्षी कान (मार्श डू) इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल भरणार असून जगातील सिनेमाप्रेमींसाठी ही खुश करणारी खबर आहे. याच जगप्रसिद्ध कान (मार्श डू) चित्रपट महोत्सवात 'भारत माझा देश आहे' हा मराठी चित्रपट दाखवला जाणार आहे.
सैनिकी परंपरा असलेल्या गावाच्या पार्श्वभूमीवरील एक हृदयस्पर्शी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. अतिशय हळुवार आणि भावनिक कथेची मांडणी "भारत माझा देश आहे" या चित्रपटातून केली गेली आहे. पांडुरंग कृष्णा जाधव यांनी आतापर्यंत दिग्दर्शित केलेल्या "मनातल्या उन्हात", "ड्राय डे" या चित्रपटांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मानसन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांचे दिग्दर्शन लाभलेला हा चित्रपट आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवीत आहे याबद्दल संपूर्ण टीम आनंदी आहे.
दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणाले की, ‘आतापर्यंत विविध महोत्सवांमध्ये या चित्रपटाची निवड झाली आहे. आता "कान्स"(मार्श डू) चित्रपट महोत्सवासारख्या प्रतिष्ठेच्या महोत्सवातील प्रदर्शनामुळे या चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.’ डॉ. आशिष अग्रवाल यांनी ‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत एबीसी क्रिएशन्स. या चित्रपटात शशांक शेंडे, मंगेश देसाई, छाया कदम, हेमांगी कवी, राजरवीसिंहराजे गायकवाड, देवांशी सामंत, नम्रता साळोखे अशी उत्तम स्टारकास्ट आहे.