मुंबई -बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सध्या छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस'च्या अकराव्या पर्वाचं सूत्रसंचालन करत आहे. हा शो नेहमीच त्यातील स्पर्धकांच्या वादांमुळे चर्चेत असतो. बऱ्याच नवनवीन टास्कचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हा शो चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. बॉलिवूडचे बरेच कलाकार देखील आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये हजेरी लावत असतात. आता या शोच्या आगामी भागात सलमान खानसोबत 'मैने प्यार किया' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलेली अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दस्सानी हा देखील हजेरी लावणार आहे.
अभिमन्यूने 'मर्द को दर्द नही होता' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री राधिका मदन देखील झळकली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार अशी कमाल दाखवू शकला नाही. आता पुन्हा एकदा तो अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत 'निकम्मा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघेही 'बिग बॉस'मध्ये स्पर्धकांना भेटण्यासाठी येणार आहेत.
हेही वाचा -रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार'चे शूटिंग पूर्ण, शेअर केला फोटो