बासू चॅटर्जी यांचा चित्रकार ते चित्रपट दिग्दर्शक हा प्रवास अचंबित करणारा आहे. छोटी सी बात, रजनीगंधा, बातों बातों में, एक रुका हुआ फैसला, चक्रव्यूह, मंझिल, स्वामी, प्रियतमा, शौकीन, चमेली की शादी, प्रेमविवाह, चितचोर यासारख्या गाजलेल्या सुमारे ५० चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. संवाद लेखक, पटकथाकार, चित्रपट निर्माता अशी ओळख असलेल्या बासूदा यांची टीव्ही मालिका क्षेत्रातही कामगिरी सरस ठरली.
बासूदा यांनी ब्लिटझ या साप्ताहिकामध्ये इलेस्ट्रेटर आणि कार्टुनिस्ट म्हणून मुंबईत आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी चित्रपट क्षेत्राचा मार्ग निवडला. बासू भट्टाचार्य यांचा सहाय्यक म्हणून त्यांनी 'तिसरी कसम' या चित्रपटात सहदिग्दर्शनाचे काम केले. राज कपूर आणि वहिदा रहेमान यांचा हा चित्रपट प्रचंड यश मिळवून गेला. त्यानंतर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. १९६९ मध्ये बासू चटर्जी यांनी 'सारा आकाश' या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. यासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार मिळाला. त्यानंतर बासूदा यांनी मागे वळून पाहिल नाही. १९७० आणि ८० चे दशक त्यांच्या चित्रपटांनी गाजवले. समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी त्यांच्या सिनेमांचे भरपूर कौतुक केले.
साध्या चित्रपटातही त्यांनी मोठमोठ्या दिग्गज कलाकारांना घेऊन त्यांच्या अभिनयाची जणू परीक्षाच घेतली. त्यांनी 'शौकिन'मध्ये मिथुन चक्रवर्तीसोबत रती अग्निहोत्री, त्यानंतर 'शीशा' चित्रपटात मिथुनसोबत मुन मुन सेन, 'उस पार' चित्रपटात विनोद मेहरासोबत मौसमी चटर्जी, 'प्रियतमा'मध्ये जितेंद्रसोबत नीतू सिंग, 'मनपसंद'मध्ये देवानंद आणि टिना मुनिम, 'चक्रव्यूह'मध्ये राजेश खन्ना आणि नीतू सिंग,' 'दिल्लगी'मध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी तसेच 'मंझील'मध्ये अमिताभ बच्चन अशा दिग्गजांना घेऊन चित्रपट बनवले. विशेष म्हणजे, राजेश खन्नासोबतचा चक्रव्यूह आणि अमिताभ यांचा मंझिल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळवू शकला नव्हता. परंतु चित्रपट समीक्षकांनी त्याचे भरपूर कौतुक केले होते. आजही क्लासिक चित्रपटांच्या यादीत या चित्रपटांचा समावेश होतो. त्यांनी आपल्या मातृभाषेचीही सेवा केली. होथात ब्रिष्टी, होचेता आणि होतात शेइ दिन हे बंगाली क्लासिक चित्रपट बनवले.