मुंबई - टायगर श्रॉफचा 'बागी ३' हा चित्रपट आज देशभर रिलीज झाला आहे. या निमित्ताने टायगर श्रॉफची आई आयेशा श्रॉफ यांनी मनापासून सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.
आयेशा यांनी टायगरच्या लहानपणीचा फोटो पोस्ट केलाय. मुलाचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी म्हटलंय. या फोटोत टायगर अत्यंत सुंदर दिसत आहे.
फोटोच्या कॅप्शनमध्ये आयेशा यांनी लिहिलंय, ''माझ्या बागी, भगवान तुझे भले करो. तुझ्याबद्दल किती अभिमान वाटतो हे सांगायला माझ्याकडे शब्द नाही. 'बागी ३' च्या कास्ट आणि क्रूलाही आशिर्वाद. टायगरियन आणि अॅक्शन फ्ॅन्स जा आणि सिनेमा पाहा. हिंदी सिनेमात अशी अॅक्शन तुम्ही पाहिली नसेल.''
आयेशा श्रॉफ यांच्या पोस्टवर भरपूर कॉमेंट्स येत आहेत. सिनेमा पाहणार असल्याचा उत्साह यात त्यांनी दाखवून दिलाय.
टायगर श्रॉफसोबत अभिनेता रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूर यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेचीही यामध्ये भूमिका आहे. रितेश हा टायगरचा भाऊ 'विक्रम'च्या भूमिकेत दिसला आहे. तर, टायगरने 'रॉनी'ची भूमिका साकारली आहे.
'विक्रम' आणि 'रॉनी' या दोन्ही भावाचा खास बॉन्ड दाखवण्यात आला आहे. विक्रम कोणत्याही कठीण परिस्थितीत अडकला, तर 'रॉनी' त्याला त्यामधून सोडवत असतो. पुढे काही कामानिमित्त विक्रम सिरियाला जातो. तिथे काही लोक त्याचे अपहरण करतात. त्याला सोडवण्यासाठी 'रॉनी' गुंडांशी कसा लढतो? 'रॉनी' त्याच्या भावाला वाचवू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं हा चित्रपटात मिळतील.
दिग्दर्शक अहमद खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, साजिद नादियाडवालाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.