मुंबई :सुशांतसिंह राजपूतची बहिण श्वेतासिंग किर्ती हिने आपल्या भावाच्या लहानपणीच्या आठवणी सांगणारी एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे. शाळेत असताना सुशांतने कसा साहसी प्रयत्न केला होता त्याबद्दल श्वेताने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे.
''भाईची नर्सरी आणि माझा एलकेजी क्लास एकाच इमारतीत होता, त्यामुळे एक वर्ष आम्ही चांगले मॅनेज केले. पण नंतर माझा युकेजी क्लास दुसऱ्या बिल्डिंगमध्ये होता आणि त्याचा एलकेजी क्लास त्याच बिल्डिंगमध्ये होता. एके दिवशी दुपारी जेवणानंतर माझ्या वर्गामध्ये भाईला पाहिले. आम्ही तेव्हा फक्त 4/5 वर्षांचे होतो.''
''त्याला पाहून मला धक्काच बसला आणि आनंदही झाला. मी त्याला विचारले की तू इथे कसा आलास, कारण त्याच्या शाळेची इमारत किमान अर्धा किलोमिटर लांब होती. त्याने सांगितले की त्याला करमत नाही आणि त्याला माझ्यासोबत राहायचे आहे. त्याच्या इमारतीतील सुरक्षा रक्षकाला त्याने कसे चुकवले असेल, तसेच तो इतक्या लांब चालत आला आणि आमच्या इमारतीच्या सुरक्षा रशकाच्या नाकाखालून तो आत आला. त्यानंतर त्याने आमचा वर्ग शोधून काढला आणि मला शोधण्यात तो किती साहसी व धैर्यवान होता या विचारात मी पडले,'' असे श्वेताने लिहिले आहे.
त्याला चिंता वाटू लागल्यामुळे सुशांतने शाळेतून चक्क पळ काढला होता.
''त्याचे शाळेतून पळून जाण्याचे कारण मला व्यावहारिक वाटले. कारण मी समजू शकत होते की, जेव्हा मला पहिल्यांदा शाळेत टाकले तेव्हा मी रडत होते आणि रडून मी वडिलांना सोडून नका जाऊ म्हणत होते. कुटुंबापासून पहिल्यांदाच बाजूला जात अनोळखी लोकांच्यात गेल्यामुळे तसे वाटणे सांहजिक होते. ५ वर्षे वयाची मी त्याची बहिण म्हणून त्याला विश्वास दिला की मी त्याच्यासोबत आहे.''