मुंबई- 'इश्कजादे' फेम अर्जून कपूर लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारीत या चित्रपटाचे शीर्षक ‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’ असे असणार आहे. या निमित्ताने अर्जून पहिल्यांदाच एका ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारणार असल्याने तो या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे.
चित्रपटात अर्जून नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. आता त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटासाठी वर्कआऊट करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. लथ-पथ, टाईम फॉर पानिपत, असे कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला आहे. इतकंच नाही, तर चित्रपटासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तो घोडेस्वारीचंही प्रशिक्षण घेत होता.
आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. अर्जुन कपूर यात सदाशिवराव भाऊ यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अर्जून कपूरशिवाय संजय दत्त आणि क्रिती सेनॉनही मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. आता अर्जूनच्या या मेहनतीला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.