मुंबई :अभिनेत्री पायल घोषने केलेल्या आरोपांबाबत दिग्दर्शक अनुराग कश्यपने मौन सोडले आहे. पायलचे आरोप बिनबुडाचे असून, आपण स्वतः कोणत्याही महिलेला त्रास देत नाही, तसेच आपल्या आजूबाजूलाही अशा घटना होऊ देत नसल्याचे अनुरागने म्हटले आहे.
अनुराग कश्यपने आपल्यावर बळजबरी केल्याचा आरोप पायल घोषने केला होता. ट्विटरवर याबाबत लिहित, तिने अनुरागला अटक करण्याचीही मागणी केली होती. तर, पायलच्या या ट्विटला रिट्विट करत कंगना रणौतनेही अनुरागला अटक करण्याची मागणी केली होती. "एव्हरी व्हॉइस मॅटर्स, मी टू, अरेस्ट अनुराग कश्यप" असे कंगनाने म्हटले होते.
पायलने ट्विट करत अनुरागवर आरोप केला होता अनुरागने आपल्या उत्तरात कंगनालाही चांगलेच धारेवर धरले आहे. "मला गप्प करण्याच्या प्रयत्नात तू स्वतः एक स्त्री असूनही बाकी स्त्रियांनाही यात ओढलेस. तुझ्या वागण्यावर काही मर्यादा ठेव. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत, एवढेच म्हणेन." अशा आशयाचे ट्विट करत अनुरागने कंगनावर निशाणा साधला आहे.
यासोबतच, "माझ्यावर आरोप करताना तू माझ्यासोबत काम करणारे कलाकार आणि बच्चन कुटुंबीयांनाही यात ओढण्याचा प्रयत्न केलास, मात्र तुला यश आले नाही." असेही तो म्हणाला. "माझे आतापर्यंत दोनवेळा लग्न झाले आहे, हा जर गुन्हा असेल, तर तो मला मान्य आहे. तसेच, मी आजवर भरपूर प्रेम केले आहे; मग ते माझ्या पहिल्या पत्नीवर असो, वा दुसऱ्या पत्नीवर, वा कोणत्या दुसऱ्या प्रेमिकेवर असो, वा माझ्यासोबत काम केलेल्या अभिनेत्रींवर असो, किंवा मग माझ्या टीममधील महिला असोत, किंवा ज्यांना मी खासगीमध्ये भेटलो आहे वा सार्वजनिकरित्या भेटलो आहे, अशा सर्व महिला असो." अशा आशयाचे ट्विट अनुरागने केले आहे.
"ज्या प्रकारचे आरोप माझ्यावर करण्यात आले आहेत, अशा प्रकारचा व्यवहार ना मी स्वतः करतो, ना माझ्या आजूबाजूला होऊ देतो. पुढे काय होते ते आपण पाहूच. तुझा व्हिडीओ पाहूनच कळते, की त्यात किती खरे आणि किती खोटे आहे. तुला आशीर्वाद आणि प्रेम. तुझ्या इंग्लिशला मी हिंदीमध्ये उत्तर दिल्याबद्दल क्षमस्व", अशा आशयाचे ट्विट करत त्याने पायलला उत्तर दिले आहे.
हेही वाचा :#MeToo : अनुराग कश्यपवर पायल घोषचे गंभीर आरोप; कंगनाचाही पाठिंबा