मुंबई - अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी चौकशीसाठी अनुराग कश्यप आज पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पोलिसांनी यापूर्वी त्याला समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.
पायल घोषने अनुरागच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करून मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. यानंतर वर्सोवा पोलिस ठाण्यामध्ये अनुराग कश्यप याच्या विरोधात कलम 376 , 354 व 341 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही अनुराग कश्यपची पोलीस चौकशी होत नसल्यामुळे, 27 सप्टेंबर रोजी पायल घोषने यासंदर्भात उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. याबरोबरच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी अनुराग कश्यप यांच्या विरोधात पोलीस कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी समन्स बजावत अनुरागला एक ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.