मुंबई- आपल्या अभिनयाने अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अनुपम खेर यांना चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ३५ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने अनुपम खेर यांनी एक पोस्ट शेअर करत चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण करण्यास मदत केल्याबद्दल राजश्री प्रोडक्शन आणि बडजात्या कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.
अनुपम यांनी राजश्री प्रोडक्शनच्या सारांश या १९८४ मध्ये आलेल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याच पार्श्वभूमीवर अनुपम यांनी निर्माता सुरज बडजात्या यांचे आभार मानले आहेत. बडजात्या कुटुंबीयांसोबतचे काही फोटो शेअर करत अनुपम यांनी त्याला कॅप्शनही दिले आहे.
देवानं लोकं बनवली आणि मग त्यानंच बडजात्या कुटुंबीयही बनवलं. ते अतिशय सुसंस्कृत, विचारशील, दयाळू आणि वेळोवेळी मदत करणारे असून मी त्यांची प्रशंसा करतो, असे अनुपम यांनी म्हटले आहे. यासोबतच राजश्री प्रोडक्शनने मला केवळ माझं करिअरचं दिलं नाही, तर मला जीवनामध्ये अनेक चांगुलपणाचे धडेदेखील दिले आहेत, असे म्हणत खेर यांनी राजकुमार बडजात्या यांचीही आठवण काढली.
याशिवाय आतापर्यंत राजश्री प्रोडक्शनसोबत केलेल्या चार चित्रपटांचा उल्लेखही अनुपम यांनी केला आहे. यात हम आपके हैं कौन, विवाह, सारांश आणि प्रेम रतन धन पायो या चित्रपटांचा समावेश आहे. ६४ वर्षांच्या अनुपम खेर यांनी बॉलिवूडला आतापर्यंत ५०० हून अधिक चित्रपट दिले आहेत. लवकरच ते 'वन डे' या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. २८ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.