‘मुळशी पॅटर्न’ चा हिंदी अवतार असलेल्या, महेश मांजरेकर दिग्दर्शित 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' चे ट्रेलर नुकत्याच उघडलेल्या मेझॉन (Maison) या चित्रपटगृहामध्ये धुमधडाक्यात अनावरीत झाले. नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टर आणि गाण्यानंतर, 'अंतिम'च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. ज्यात 'अंतिम दुनिया' ची सर्वात मोठी झलक आहे. या ट्रेलरमध्ये सलमान खान च्या भूमिकेवर भर दिल्याचे जाणवते जेणेकरून अत्याधिक प्रेक्षकवर्ग चित्रपटगृहांकडे खेचला जाईल. सलमान खान आणि आयुष शर्माने एकत्र येऊन आपल्या चाहत्यांसाठी ट्रेलरचे अनावरण केले व उपस्थित प्रेक्षकांच्या त्याला जबरदस्त ऊर्जावान प्रतिक्रिया मिळाल्या. ट्रेलरला मुंबईसोबतच इंदौर, गुरुग्राम आणि नागपुर येथे एकाच वेळी रिलीज करण्यात आले..
या चित्रपटात सलमान खान एका शीख पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे आणि आयुष्य ‘रावल्या’ च्या भूमिकेत. ट्रेलरमध्ये कथेतील पात्रे आणि कथेचे जग उत्तम प्रकारे मांडण्यात आले आहे. चित्रपटात आपापल्या भूमिका साकारण्यासाठी सलमान आणि आयुष दोघांनाही आपल्या शरीरावर लक्षणीय मेहनत घेतल्याचे जाणून येते आणि ते ट्रेलरमध्ये उत्तमरीतीने दिसून येत आहे. रोमहर्षक ऍक्शन-पॅक ट्रेलरमध्ये, सलमान खान एका डॅशिंग, पोलिसाची भूमिका साकारत आहे जो गुन्हे रोखण्यासाठी काहीही करू शकतो. सलमान कमालीचा उत्साही आणि दृढनिश्चयी दिसत असून त्याला सरदारच्या पोशाखात पाहणे त्याच्या फॅन्ससाठी पर्वणी ठरेल. ट्रेलरमध्ये आयुषच्या व्यक्तिरेखेतील परिवर्तनाची झलकही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. चित्रपटातील एका निष्पाप तरुण मुलापासून ते सर्वात आक्रमक, भयंकर आणि प्रादेशिक गुंडांपैकी एक असा आयुषचा प्रवास अविश्वसनीय आहे जो चित्रपटात पाहणे मनोरंजक असेल.