महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागून एक आठवडा उलटून गेला आहे. मात्र, अद्यापही मुख्यमंत्री कोण? याचा निर्णय होताना दिसत नाही. महाराष्ट्रातील राजकारणात ज्यांना रस आहे ते याच गोष्टींवर बोलत असतात, विचार करीत असतात. लोकांच्या असंख्य समस्या मुख्यमंत्री सोडवू शकतो हे नायक चित्रपटातून अनिल कपूरने दाखवून दिले होते. एक दिवसाचा मुख्यमंत्री बनून या नायकने प्रेक्षकांना वेड लावले होते. आता अनिल कपूरलाच मुख्यमंत्री करा, असे ट्विट एका चाहत्याने केला आहे.
'तिढा सुटे पर्यंत अनिल कपूरला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा' - Nayak movie
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर मतभेद आहेत. हा तिढा सुटेपर्यंत अनिल कपूरला मुख्यमंत्री करण्याचा सल्ला चाहत्यांनी दिलाय. यावर अनिल यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल कपूर यांचा चाहता असलेले विजय गुप्ता यांनी आपल्या ट्विटरवर अनिल कपूर यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे ट्विट केले. त्यांनी लिहिलंय, महाराष्ट्त जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत अनिल कपूर यांना बनवून पाहूयात. त्यांचा एक दिवसाचा कार्यकाळ संपूर्ण देशाने पाहिला आहे. असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांना गुप्ता यांनी हे ट्विट टॅग केले आहे.
हे ट्विट प्रसिध्द झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अनिल कपूरनेही रिट्विट करीत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय, 'मी नायक आहे तेच ठीक आहे.'