मुंबई - काळजाचा ठोका चुकवणारे स्टंट आणि ते साकारण्याची जिद्द ठेवणारे कलाकार रोहित शेट्टीच्या 'खतरो के खिलाडी' या कार्यक्रमात पाहायला मिळतात. सध्या या कार्यक्रमाचा १० वा सिझन सुरू झाला आहे. यामध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही सहभाग घेतला आहे. अलिकडेच तिला एक चित्तथरारक स्टंट साकारण्याचा टास्क देण्यात आला होता. हा स्टंट तिने मोठ्या हिमतीने पूर्ण केला. तिचा हा स्टंट पाहून तिची आईदेखील थक्क झाली आहे.
अमृताने स्वत: 'खतरो के खिलाडी' च्या या भागाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिला हेलिकॉप्टरला अडकवलेल्या जाळीवर चढून पुन्हा समुद्राच्या पाण्यात उडी मारण्याचा टास्क देण्यात आला होता. तिच्यासोबत सुप्रसिद्ध डान्सर आणि कोरिओग्राफर धर्मेश देखील होता. दोघांनी हा टास्क पूर्ण केला. हा व्हिडिओ पाहताना तिच्या आईला अमृताचा फार अभिमान वाटत होता. मात्र, त्यासोबत आपल्या लेकीचा स्टंट पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर भीती देखील दिसत होती.