मुंबई -कोरोना महामारीच्या काळात शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यालाही महत्व प्राप्त झाले आहे. म्हणजे ते महत्व नेहमीच होतं, परंतु या लॉकडाऊनमधील रिकाम्या वेळात त्याचे मोल कळत आहे. या महामारीमुळे जगाची, आणि अर्थातच देशाची, आर्थिक घडी विस्कटली. अनेक व्यवसाय संकटात सापडले, काही तर बंद पडले. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, ज्यांच्या टिकल्या त्यांना कमी पगारात काम करावे लागतेय. सतत घरातच राहिल्यामुळे जोडप्यांमध्ये वितुष्ट येऊ लागले आणि लहान मुलांना खेळायला न मिळाल्यामुळे त्यांची चिडचिड होऊ लागली. अशा एक ना अनेक समस्यांमुळे लोकांचे मानसिक आरोग्य घायकुतीला आलेय. त्यातच कोरोना होऊ न देण्याचे टेन्शन. या सगळ्यामुळे अनेकांना मानसिक आजार जडले. परंतु या सर्वावर शारीरिक आणि मानसिक व्यायाम करणे हा उपाय आहे. खासकरून मानसिक व्यायाम, ज्यासाठी भारतीय योगा सर्वोत्तम आहे. अनेक सेलिब्रिटीजसुद्धा योग करण्याचे सुचवत असतात, त्यातीलच एक आहे मराठी व हिंदी मनोरंजनसृष्टीत लीलया वावरणारी अमृता खानविलकर.
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अमृता खानविलकरने सोशल मीडियावर योगाचे फोटोज शेअर करत, आजच्या काळात योगा किती महत्वपूर्ण आहे, हे पटवून देत आपल्या फॉलोअर्सना योगा करण्यासाठी प्रेरित केले आहे. ‘सध्याचे तणावपूर्ण वातावरण पाहता आपण सर्वांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे खूपच गरजेचे आहे आणि यावर एकमेव उपाय म्हणजे योगा. योगा हा अनेक आजारांवरील रामबाण उपाय असून मनःशुद्धीसाठीही अतिशय उत्तम औषध आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच फायदेशीर ठरणाऱ्या या योगाचे महत्त्व आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे. या महामारीच्या काळात योगाभ्यास करून मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहा’ असे अमृता सांगते. अमृता सांगते योगाचे महत्व आपल्या या योगाभ्यासाबद्दल अमृता खानविलकर पुढे म्हणते,''सध्या आजूबाजूचे वातावरण खूपच भयंकर आहे. त्यामुळे अनेकदा नैराश्यही येते. इतकी वर्षं या क्षेत्रात असल्याने शूटिंगच्या, मीटिंग्सच्या, कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकांशी भेटीगाठी होत होत्या. मित्रमैत्रिणींना भेटणं होत. आणि अचानक माणसांचं भेटणं बंद झाल्याने, कुठेतरी मेंटल ब्लॉक झाला आहे. कलाकार म्हणून प्रेक्षकांसमोर वावरत असतानाच पडद्यामागे आम्हीही एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आयुष्य जगत असतो आणि त्यावेळी आम्हालाही कुठेतरी नैराश्य, तणाव येतोच आणि यातून बाहेर पडण्याचा एकमेव उपाय म्हणजे योगा. मानसिक, शारीरिक स्वास्थ्यासाठी मी सध्या योगाला प्राधान्य देत आहे आणि याचा मला खूपच फायदा होत आहे. त्यामुळेच मी तुम्हालाही हेच सांगेन, की दिवसातला काही वेळ तुम्हीही योगासाठी द्या. या तणावपूर्ण वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा देणारा हा उपाय आहे.''सकारात्मक ऊर्जेसाठी योगा हा उत्तम उपाय आहे, असे अमृता खानविलकर छातीठोकपणे सांगते.