घरचे खाणे पौष्टिक असते आणि त्यामुळे ते खाण्यास प्राधान्य दिले पाहिजे असे बडेबुजुर्ग नेहमी सांगत असतात. खासकरून गरोदरपणात महिलांनी हे लक्षात ठेवले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या बाळाला सर्व प्रकारचे पौष्टिक अन्न मिळावे. गरोदर असताना अभिनेत्री अमृता राव हिनेसुद्धा या सूत्राचा अवलंब केला होता आणि गरोदर राहिल्यापासून मुलाच्या जन्मानंतरही बरेच महिने तिने फक्त घरचेच, फक्त आईच्या हातचे, जेवण घेण्यास प्राधान्य दिले. परंतु आता तब्बल १९ महिन्यांनंतर अमृताने तिच्या आवडत्या इटालियन रेस्टॉरंट मधून जेवण मागविले आणि त्याची लज्जत चाखली आणि स्वतःला ट्रीट दिली.
आरजे अनमोलशी लग्न झाल्यानंतर अमृता रावने गेल्या नोव्हेंबरमध्ये तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव वीर ठेवले आहे. लॉकडाऊनमध्ये ती गर्भवती झाली म्हणून, नऊ महिने ती बाहेर खाऊ शकत नव्हती आणि डिलीव्हरीनंतर लोकांनी तिला चायनीज अन्न न घेण्याचा सल्ला दिला होता जो तिने इमानेइतबारे पाळला. परंतु तिने आता आपल्या भावना आपल्या फॅन्ससोबत शेयर करताना लिहिले की, “हा आहे माझा ‘मॉमी’ टाइम ते ‘मी’ टाइम. १९ महिन्यानंतर मी हॉटेलमधून खाणे मागविले. माझ्या आवडीच्या त्या रेस्टॉरंटने सर्व मार्गदर्शक तत्वे पाळत माझ्यासाठी पूर्णतः ‘हेल्दी’ जेवण बनविले. मला वाटतं की इतक्या महिन्यांनंतर मला ही ‘ट्रीट’ मिळायला काहीच हरकत नसावी. आणि मी तक्रार अजिबात करीत नाहीये कारण कदाचित ‘मॉमी’ बनण्याचा हा फायदा असावा ”