मुंबई-बीग बी अमिताभ बच्चन आज (११ ऑक्टोबर) ७८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यंदाचा वाढदिवस ते नक्की कसा साजरा करणार याची उत्सुकता त्यांच्या कोट्यावधी फॅन्सना देखील आहे. मात्र हा दिवस नेहमीप्रमाणे साध्या पद्धतीने साजरा करण्यालाच त्यांचं प्राधान्य राहिल.
७८ व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला बीग बींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ते ट्रॅकसूट घालून तोंडाला मास्क लावून माईकसमोर बसून समोरच्या स्क्रिनवर काहीतरी पहात आहेत. यासोबत त्यांनी पोस्ट टाकली आहे की, सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ९ वाजेपर्यंत कौन बनेगा करोडपतीसाठी शुटिंग केल्यावर आता रात्री नऊ वाजता पुन्हा रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओमध्ये आलो आहे. कठोर परिश्रम केल्याशिवाय जगात काहीही मिळत नाही, बाबूजींनी दिलेली हीच शिकवण आपण आजपर्यंत पाळलेली असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हंटल आहे.
खरं तर बीग बी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करतात. त्यांना आपला वाढदिवस कायम कामात घालवायला आवडतो. यावेळी देखील कौन बनेगा करोडपतीचं शुटिंग सुरू असल्याने ते कामात व्यस्त असतील. मात्र सुदैवाने यंदा ११ ऑक्टोबर हा दिवस रविवारी आला असल्याने घरातल्या घरात कुटुंबासोबत आणि नातवंडांसोबत वेळ घालवत ते हा दिवस साजरा करतील अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेली आहे.
यंदाचं वर्ष तसं बच्चन कुटुंबासाठी थोडं त्रासाचं गेलं, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर त्यांचं कुटुंब देखील या तडाख्यातून वाचू शकलं नाही. खुद्द बीग बींना देखिल कोरोना झाला. त्यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा अभिषेक, त्याची पत्नी ऐश्वर्या आणि नात आराध्या हे देखील कोरोना पॉझिटीव्ह झाले. त्यामुळे तब्बल १४ दिवस त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली नानावटी रूग्णायलयात रहावं लागलं. त्यानंतर ते सुखरूप घरी परतले. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या वागण्याला एक शिस्त लावून घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कौन बनेगा करोडपती या गेम शोचं शुटिंग सुरू झाल्यानंतर देखील राज्य सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं त्यांनी काटेकोरपणे पालन करायला सुरूवात केली आहे.
दरवर्षी बीग बी यांचा वाढदिवस म्हंटलं की त्यांच्या बंगल्याला नावाप्रमाणेच जलशाचं स्वरूप प्राप्त होतं. मुंबई आणि मुंबई बाहेरील हजारो फॅन्स त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानासमोर गर्दी करतात. बीग बी देखील घराबाहेर येऊन प्रेक्षकांना अभिवादन करून या शुभेच्छांचा स्वीकार करतात. त्यानंतर माध्यमांना बंगल्याच्या आवरात बोलवून त्यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतात. काही निवडक पत्रकारांना वैयक्तिकरित्या भेटून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याची संधी यानिमित्ताने मिळते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लोकांना एकत्र यायला मज्जाव असल्याने पोलीस जास्त गर्दी होऊ देतील असं वाटत नाही. तर स्वतः अमिताभ देखील स्वतः घराबाहेर येऊन लोकांना दर्शन देण्याची शक्यता कमीच आहे. त्याऊलट प्रेक्षकांनी सोशल मीडियाद्वारे दिलेल्या शुभेच्छांचाच ते स्वीकार करतील अशी शक्यता आहे.
आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलेला हा अभिनेता आजही त्यांच्या करोडो फॅन्सच्या हृदयात आपलं एक अढळ स्थान कायम ठेवून आहे. वयाच्या ७८ मध्ये प्रवेश करनाता दोनच दिवसांपूर्वी दीपिका पदुकोण आणि प्रभास यांच्यासोबतच्या आगामी सिनेमात अमिताभ हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा सिनेमा हिंदी आणि दाक्षिणात्य भाषांमध्ये एकाच वेळी शूट केला जाणार आहे. याशिवाय अभिताभ यांची मुख्य भूमिका असलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' हा सिनेमा लवकरच रिलीज होण्याची शक्यता आहे. याशिवाय अयान मुखर्जीच्या बहुप्रतिक्षित 'ब्रम्हास्त्र' या सिनेमात ते रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाची देखील त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
बिग बींचा वाढदिवस त्यांच्या डाय हार्ट फॅन्ससाठी एखाद्या सण किंवा उत्सवापेक्षा आजिबात कमी नसतो. मात्र यंदा कोरोनाच्या तावडीतून नुकत्याच बचावलेल्या आपल्या लाडक्या अभिनेत्याला दिर्घायुष्य मिळो हिच प्रार्थना करून त्यांचे फॅन्स त्यांना शुभेच्छा देतील. ई टीव्ही भारत कडून देखील बिग बी अतिताभ बच्चन यांना ७८ व्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...