मुंबई- १९७७मध्ये रिलीज झालेल्या 'अमर अकबर अँथोनी' या चित्रपटाला ४३ वर्ष पूर्ण झाली आहेत. मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी या सिनेमाच्या आठवणींना उजाळा देत काही फोटो आणि सेटवरील आठवणी ताज्या केल्या आहेत.
अमिताभ यांनी 'अमर अकबर अँथोनी' चित्रपटाच्या सेटवरील काही दुर्मिळ फोटो शेअर केले आहेत. यात चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ दिसत आहेत. त्यांनी गाजलेल्या गाण्याचे शीर्षक पोस्टरही शेअर केले आहे.
अमर अकबर अँथोनी'ने त्याकाळात बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. बिग बी यांनी याची तुलना बाहुबली २ शी केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, ४३ वर्ष...'अमर अकबर अँथोनी'ने त्या काळात ७.२५ कोटीचा व्यवसाय केला होता. आजच्या महागाईचा विचार केला तर ही रक्कम बाहुबली २ ने केलेल्या कमाईशी बरोबरी साधणारी आहे.
मेगास्टारने आपली मुले श्वेता आणि अभिषेक बच्चन यांच्याबरोबर एक मौल्यवान आठवणदेखील शेअर केली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक अनमोल थ्रोबॅक फोटो टाकला आहे. यात बच्चन आपली लहान मुलगी श्वेताच्या ओठांचे चुंबन घेत असल्याचे दिसून येत आहे, तर अभिषेक त्यांच्या मांडीवर कुशीत बसलेला दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, की "श्वेता आणि अभिषेक मला अमर अकबर अँथनीच्या सेटवर भेटले .. 'माझे नाव अँथनी गोन्साल्विस' या गाण्याच्या शूटिंगच्यावेळचा हा प्रसंग.. हॉलिडे इन बॉल रूममध्ये.. बीचसमोरचा हा फोटो आहे.."
चित्रपटाशी संबंधित आठवणी सांगताना बच्चन पुढे म्हणाले, "एएएची आज 43 वर्षे! जेव्हा मान जी मला चित्रपटाची कल्पना सांगायला आले आणि मला शीर्षक सांगितले.. तेव्हा मला वाटले, की त्यांनी चूक केली आहे.. '७० च्या दशकात जेव्हा चित्रपटांची शीर्षके बेहेन भाभी आणि बेटीच्या भोवती फिरत होती, तेव्हा हे शीर्षक फारच वेगळे होते.. पण त्या काळात त्यानी ७.२५ कोटीचा व्यवसाय केल्याची बातमी आहे.. महागाईचा विचार केला तर बाहुबली २च्या कमाईशी बरोबरी होऊ शकते. तुलना काहीही असो पण त्याकाळात हा व्यवसाय खूप मोठा होता. एकट्या मुंबईतील २५ थिएटरमध्ये हा सिनेमा २५ आठवडे चालला होता. असे आता घडणे शक्य नाही. गेले ते दिवस.''
मनमोहन देसाई यांनी निर्मिती आणि दिग्दर्शित केलेला आणि कादर खान यांनी लिहिलेल्या अमर अकबर अँथोनी या चित्रपटात विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर आणि शबाना आझमी, परवीन बाबी आणि नीतू सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या.