बेंगळुरू (कर्नाटक) - टॉलिवूड सुपरस्टार अल्लू अर्जुनने गुरुवारी दिवंगत कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या बेंगळुरू येथील घरी भेट दिली. पुष्पा चित्रपटातील या अभिनेत्याने दिवंगत पॉवर स्टारच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि दिवंगत पुनीत राजकुमारला श्रद्धांजली वाहिली.
अल्लू अर्जुनने दिवंगत पुनीत राजकुमारच्या कुटुंबातील सदस्य, त्याचा भाऊ शिवराजकुमार आणि त्याची पत्नी यांच्याशी संवाद साधला. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर समोर आले असून ते व्हायरल झाले आहेत.
अल्लू अर्जुनने गुरुवारी ट्विटरवर दिवंगत अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. फोटोत तो पुनीत राजकुमारच्या पोर्ट्रेटवर फुले अर्पण करताना दिसत आहे. त्यासोबत अल्लू अर्जुनने लिहिले: "पुनीत गारु यांना माझी विनम्र आदरांजली. राजकुमार गारु यांचे कुटुंबीय, मित्र, हितचिंतक आणि चाहते यांना माझा आदर."
अभिनेता पुनीत राजकुमार याचा २९ ऑक्टोबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. आकस्मिक मृत्यूच्या वेळी तो ४६ वर्षांचा होता. त्याच्या निधनाने संपूर्ण कर्नाटक आणि भारतात इतरत्र शोक व्यक्त करण्यात आला होता.
हेही वाचा -अक्षयच्या 'पृथ्वीराज' चित्रपटावर बंदी घालण्याची करणी सेनेची मागणी