हैदराबाद- साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'RRR' रिलीज होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट यावर्षी ७ जानेवारीला रिलीज होणार होता. कोरोना व्हायरसमुळे चित्रपट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला. पॅन इंडिया चित्रपट 'RRR' हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत अजय देवगण आणि आलिया भट्ट यांना साऊथच्या चित्रपटात पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे. दरम्यान, या चित्रपटात छोटी भूमिका साकारण्यासाठी आलिया भट्ट आणि अजय देवगणच्या घरी पैशांचा पाऊस पडल्याची बातमी समोर आली आहे.
१५ मिनीटांच्या रोलसाठी आलियाला मिळाली मोठी रक्कम
साउथ सुपरस्टार रामचरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपट 'RRR' हा मेगा बजेट प्रोजेक्ट आहे. त्यात काम करणाऱ्या मुख्य कलाकारांना भरमसाठ फी दिली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया बॉलीवूड चित्रपटासाठी जेवढे शुल्क घेते, जवळपास तेवढीच फी 'RRR' चित्रपटातील 15 मिनिटांच्या भूमिकेसाठी घेतली आहे. या चित्रपटासाठी आलियाला ९ कोटी रुपये मानधन मिळाले आहे.