मध्यंतरीच्या काळात हॉलीवूडप्रमाणेच बॉलिवूडमध्येसुद्धा चित्रपट 3D मध्ये प्रदर्शित करण्याची टूम निघाली होती, याचे कारण म्हणजे काही 3D चित्रपटांना मिळालेला अमाप प्रतिसाद. या ‘थर्ड डायमेन्शन’, ‘तिसरा आयाम’ म्हणजेच 3D मुळे तरुण प्रेक्षकवर्ग, खासकरून लहान मुले, चित्रपटाकडे आकर्षित होतात असे मानले जाते. सध्याच्या कोरोना काळात चित्रपटगृहे कित्येक महिने बंद आहेत आणि ‘पिक्चर देखनेका असली मझा थेटरमेंही आता हैं’ यावर प्रेक्षक आणि बॉलिवूडकरांचे एकमत आहे. त्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी चित्रपटगृहे उघडण्याची वाट पहात आहे. गेल्यावर्षीच्या सुरुवातीपासूनच अनेक तयार चित्रपटांचे प्रदर्शन-वेळापत्रक कोलमडले आहे ज्यात, 83, सूर्यवंशी सारखे, मोठे चित्रपटही आहेत.
अक्षय कुमार एक असा अभिनेता, आणि आता निर्माताही, आहे जो चित्रपट बनविणे आणि प्रदर्शित करणे यावर जास्त वेळ खर्च करीत नाही. भले त्याची भूमिका असलेला ‘लक्ष्मी’ आणि त्याने निर्मिती केलेला भूमी पेडणेकर अभिनित ‘दुर्गामती’ ओटीटी वर रिलीज झालेले असो तोसुद्धा सिनेमाहॉल्स उघडण्याची वाट पाहतो आहे. एक तर तो त्याची प्रमुख भूमिका असलेला रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ प्रदर्शनाची वाट पाहतोय आणि लॉकडाऊन शिथिल झाल्याझाल्या त्याने पूर्ण केलेला पहिला चित्रपट ‘बेलबॉटम’ त्याला चित्रपटगृहांतच प्रदर्शित करायचा आहे. ‘बेलबॉटम’ ओटीटी वर जाणार अश्या वावड्या उठतात असताना त्याने तो २७ जुलैला प्रदर्शित होईल अशी घोषणा केली होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ती तारीख पुढे ढकलली गेली आता आता हा चित्रपट १९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे, चित्रपटगृहांत.