मुंबई - कार्तिक आर्यन 'दोस्ताना 2' मधून बाहेर पडल्यामुळे मनोरंजन जगतात खळबळ उडाली आहे. केवळ दोस्तानाच नाही तर धर्मा प्रॉडक्शनच्या आगामी चित्रपटातही कार्तिकला काम मिळणार नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. कारण कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांनी २० दिवसांचे दोस्ताना २ चे शूटिंग केले आहे. हे सर्व रद्द करणे हे आर्थिकदृष्ट्या तर तोट्याचे आहेच पण दिग्दर्शक कॉलिन डिकुन्हासाठी व जान्हवीसाठीही पुन्हा मेहनत करावी लागणार आहे.
या चित्रपटाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी करण जोहरने आपला चांगला मित्र अक्षय कुमारला गळ घातली आहे. रिपोर्टनुसार करण जोहरने वैयक्तिकरित्या अक्षयला दोस्ताना 2 च्या कलाकारांमध्ये सामील होण्यासाठी विनंती केली असून या कठीण प्रसंगातून चित्रपट बाहेर काढण्यासही मदत करण्यास सांगितले आहे. अक्षयची इच्छा असेल तर मूळ स्क्रिप्टमध्येही काही बदल केले जाऊ शकतात.
यापूर्वी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता विक्की कौशल आणि राजकुमार राव यांच्या नावाचीही चर्चा कार्तिक आर्यनचा बदली कलाकार म्हणून सुरू होती. पण आता निर्माता एकदम हुकमी कालाकाराचा शोध घेत आहेत असे दिसत आहेत.