नागपूर - लॉकडाऊनमुळे आपल्या घरी न परतू शकलेल्या शेकडो रोजंदारीवरील मजूरांसाठी महाराष्ट्र शासनाने आसरा केंद्रे स्थापन केली आहेत. इथे थांबलेल्या लोकांना केवळ स्वस्थ बसण्यापलिकडे कोणतेही काम नाही. कंटाळलेल्या मजूरांना मनोरंजनाचे साधनही नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊन पोलिसांनी ओपन थिएटरची संकल्पना राबवली आहे. यात अलिकडेच देशभर गाजलेल्या 'तान्हाजी' चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. यामुळे मजूरांच्या चेहऱ्यावर वेगळे समाधान मिळाले. विशेष म्हणजे या उपक्रमाची नोंद स्वतः अजय देवगणने घेतली आहे. त्याने नागपूर पोलिसांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धन्यवाद दिले आहेत.
आसरा केंद्रात दाखवण्यात आला 'तान्हाजी', अजय देवगणने मानले पोलिसांचे आभार
लॉकडाऊनच्या काळात आसऱ्यासाठी थांबलेल्या लोकांसाठी तान्हाजी हा सिनेमा नागपुरात दाखवण्यात आलाय या गोष्टीची नोंद स्वतः अजय देवगणने घेतली आहे. याबद्दल त्याने नागपूर पोलिसांचे आभारही मानले आहेत.
आपल्या ट्विटमध्ये अजय देवगणने लिहिलंय, ''मी किंवा माझे चित्रपट कोणत्याही माध्यमातून मदत करु शकणार असेल तर या गोष्टीचा मला आनंदच होईल. तुमच्या मार्फत झालेल्या चांगल्या प्रयत्नबद्दल धन्यवाद.''
अजय देवगणने अलिकडेच एक ट्विट करीत मुंबई पोलिस घेत असलेल्या परिश्रमाचे कौतुक केले होते. अजयने ट्विटमध्ये लिहिले होते, "प्रिय मुंबई पोलीस, तुम्हाला जगातील सर्वश्रेष्ठांपैकी एक मानले जाता. कोव्हिड १९ महामारीसाठी तुम्ही करीत असलेले योगदान अद्वितिय आहे. सिंघम आपली वर्दी परिधान करेल आणि जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुमच्यासोबत उभा राहील. जय हिन्द, जय महाराष्ट्र."