भारतीयांचे संगीतप्रेम ओळखून अनेक म्युझिक कंपन्या अस्तित्वात आल्या आणि त्यात सातत्याने भर पडत असते. ‘रॉयल्टी इश्यू’ सुव्यवस्थित झाल्यापासून यात आणखीनच भर पडत आहे. नुकताच संगीतक्षेत्रात एका नवीन लेबलचा प्रवेश झाला असून, ‘पॅनोरमा म्युझिक' ची निर्मिती झाली आहे. सिनेनिर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी 'पॅनोरमा म्युझिक' या संगीतमय लेबलची नुकतीच घोषणा केली आहे. बॅालिवूड स्टार अजय देवगण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पॅनोरमा म्युझिकच्या लेबलचं प्रमोशन करणारा व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची बातमी आपले चाहते आणि संगीतप्रेमींपर्यंत पोहोचवली असून, चॅनल सबस्क्राइब करून सुमधूर संगीताचा आस्वाद घेण्याचे आवाहनही केलं आहे.
'पॅनोरमा म्युझिक'च्या घोषणेच्या निमित्तानं अजय देवगण म्हणाला की, “डिजिटल माध्यमांमुळे संगीतामधील संधी वाढल्या आहेत. भारताला एक समृद्ध संगीत परंपरा लाभली असून, यातील अद्याप अनेक पैलू समोर आलेले नाहीत. संगीताचं माझ्या मनात वेगळं स्थान असल्यानं संगीताची आवड मी कायम जोपासली आहे. 'पॅनोरमा म्युझिक' हे पॅनोरमा स्टुडिओचं योग्य दिशेनं टाकलेलं पाऊल असून, मी त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो.”
'पॅनोरमा म्युझिक' चे नेतृत्व राजेश मेनन करणार आहेत. या लेबलअंतर्गत ओरिजनल सिंगल्स, चित्रपट संगीत, स्वतंत्र संगीत आणि प्रादेशिक कॉन्टेंटची निर्मिती केली जाणार आहे. संगीतकारांसोबतच कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ देण्याच्या हेतूनं सुरू केलेलं हे लेबल प्रादेशिक भाषेतील संगीत निर्मितीवर विशेष भर देईलच, पण यासोबतच हिंदी निर्मीती मध्ये मुख्यतः सूफी, गझल आणि भक्तिमय अशा विविध संगीतरचनांचा समावेश करण्यात येईल.