मुंबई -हल्ली चित्रपट सुरु करताना, त्याचे शूटींग करताना, त्यातील कलाकार तसंच इतर गोष्टी गुप्त ठेवण्याची प्रथा पडलीय. प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची अभिरुची टिकवून ठेवण्यासाठी हे केले जाते. बॉलीवूडची 'दंगल' गर्ल फातिमा सना शेख चित्रीकरण करत असलेल्या एका चित्रपटाचा तपशीलही असाच गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. मात्र या चित्रपटात फातिमा खेळाडूची भूमिका साकारणार असल्याची माहिती मात्र मिळाली आहे.
अनिल कपूरसोबत राजस्थानात चित्रीकरण
सध्या फातिमा सना शेख अनिल कपूरसोबत राजस्थानात एका नवीन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. फातिमातर्फे सूत्रांमार्फत असे कळविण्यात आले की, “२०२१ मध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा फातिमाने संकल्प सोडला असून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ती सध्या राजस्थानमधील एका मोठ्या प्रोजेक्टच्या आउटडोअर शुटिंगमध्ये व्यस्त आहे.”
फातिमाने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटविली आहे फातिमाने साकारल्या वेगवेगळ्या भूमिका
फातिमा सना शेख हिने ‘दंगल’ या चित्रपटातून उल्लेखनीय पदार्पण केले होते. त्यातील कुस्तीपटू रंगवताना तिने प्रचंड मेहनत घेतली होती. ‘दंगल’ ला अभूतपूर्व यश मिळाले आणि फातिमाला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. लॉकडाऊन दरम्यान तिची भूमिका असलेला ‘ल्युडो’ तिसऱ्या पडद्यावर (डिजिटल माध्यमावर) प्रदर्शित झाला. या चित्रपटात फातिमा अत्यंत वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना दिसली. हातात बंदूक घेऊन शांतपणे गुंडांशी झुंज देणारी आईची भूमिका साकारणारी ही बहुआयामी अभिनेत्री भाव खाऊन गेली होती.
'सूरज पे मंगल भारी'ला चांगला प्रतिसाद
लॉकडाऊननंतर तिचा ‘सूरज पे मंगल भारी’ चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. नुकतेच त्याने पन्नासावा दिवसही साजरा केला. हल्ली थिएटर्समध्ये सिनेमा एक-दोन आठवडे टिकतो त्यामुळे हे यश मोठे मानले जात आहे. फातिमाने या चित्रपटात मराठी मुलगी साकारली होती व तिचे मराठी उच्चार अजिबात न खटकणारे होते. ‘सूरज पे मंगल भारी’ मध्ये तिच्यासोबत दिलजित दोसांझ आणि मनोज बाजपेयी यांच्याही भूमिका आहेत.
चित्रपटातील भूमिकेविषयी प्रेक्षकांना उत्सुकता
अलीकडेच फातिमाने सेटवरील कर्मचारी, सहकारी कलाकार आणि अनिल कपूर यांच्यासमवेत सेटवर २९ वा वाढदिवस साजरा केला. ढोल वाजवत तिचे स्वागत करण्यात आले व फातिमाने आपल्या टीमच्या उपस्थितीत केक कापला. फातिमाने आतापर्यंत केलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयकौशल्याची चुणूक दाखविली असून आता येणाऱ्या चित्रपटात ती कोणत्या खेळातील खेळाडू साकारतेय याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
हेही वाचा -धर्माला बदनाम करण्यासाठी हिंदूच कारणीभूत - राजू श्रीवास्तव