मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे न्यायालयाने कंगनाच्या विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. तशाच प्रकारचे आदेश आता अंधेरी न्यायालयही देऊ शकते.
मुंबईतील अंधेरी मॅजिस्ट्रेट न्यायालयात कंगना रणौतच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका आली कशीफ खान देशमुख यांच्याकडून दाखल करण्यात आलेली आहे. कंगना रणौतने तिच्या ट्विटर अकाउंटवर दोन समाजांमध्ये वैमनस्य निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य वारंवार केले असून, त्यासंबंधी कलमांनुसार तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी 10 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे स्पष्ट केला आहे.
कंगना रणौतने नजीकच्या काळात तिच्या सोशल माध्यमांवर बॉलीवुडबद्दल केलेले ट्विट आणि पोस्ट सादर केले होते. या पोस्टमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही बॉलीवुडमध्ये हिंदू-मुस्लीमांमध्ये तणाव असून, तसे दोन गट असल्याचं तिने म्हटलं होतं. याबरोबरच मुस्लिम बहुल चित्रपटसृष्टीत मी स्वतः माझं नाव मोठं केलं असल्याचे तिने म्हटले होते. मात्र, बॉलीवूडचे धर्माशी किंवा जातीपातीशी काही घेणे देणे नाही. असे याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान, वांद्रे न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल या दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी त्यांना 26 ऑक्टोबर व 27 ऑक्टोबर अशा दोन दिवशी वांद्रे पोलीस ठाण्यांमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.