मुंबई- अभिनेता अर्जुन बिजलानीचा ६ वर्षांचा मुलगा आयन याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे त्याने बुधवारी सांगितले. काही दिवसांपूर्वी अर्जुनची पत्नी नेहा स्वामीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.
इन्स्टाग्रामवर अर्जुनने सांगितले, की पहिल्या वेगवान चाचणीत त्याच्या मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु पीसीआर चाचणीमध्ये तो पॉझिटिव्ह ठरला आहे. अयान सध्या क्वरंटाइनमध्ये राहात आहे.
अर्जुनने लिहिलंय, "ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती, त्याच गोष्टी घडल्या. माझा मुलगा अयानचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पहिली वेगवान चाचणी निगेटिव्ह झाली असली तरी पीसीआर चाचणीचा अहवाल नंतर पॉझिटीव्ह आला. माझी पत्नी नेहा हिला अगोदरपासूनच क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे, ती या विषाणूशी लढा देत आहे. माझ्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. हे असेच रहावे म्हणजे मला दुरून का असेना दोघांची सेवा करता येईल.''
अर्जुनने सर्वांना सावध राहण्याचा सल्ला दिलाय.
तो पुढे म्हणाला, "यावेळी, मी फक्त तुम्ही सुरक्षित राहा एवढेच सांगेन. व्हायरस आपल्याला केव्हा आणि कोठे गाठेल हे सांगता येत नाही. बाहेरुन जग सुंदर दिसत आहे, परंतु सतर्क राहणे चांगले आहे. वेगवेगळ्या लोकांमध्ये व्हायरसची वेगवेगळी लक्षणे दिसत आहेत. कृपया याकडे दुर्लक्ष करू नका.''