मुंबई- अभिनेता अक्षय कुमारची कोविड -१९चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्याला मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोविडची चाचणी घेण्यापूर्वी अक्षय 'राम सेतू' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. सेटवरील क्रू मेंबर्सचीही कोविड-१९ चाचणी घेतली असता ४५ जणांना कोरोनाची लागण झाला असल्याचे उघड झाले आहे.
'राम सेतू' चित्रपटाचे शुटिंग सुरू झाल्यानंतर ५ व्या दिवशी अक्षय कुमारची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यानंतर ४५ क्रू मेंबर्सचीही कोविड चाचणी पॉझिटीव्ह आली. मिळालेल्या माहितीनुसार 'राम सेतू' चित्रपटाचे शूटिंग मुंबईच्या मढ आयलँडमध्ये सुरू होते. यासाठी १०० जणांचा क्रू काम करीत होता. यातील ४० ज्यूनियर आर्टीस्टची कोविड १९ चाचणी पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
क्रू मेंबर्सची पॉझिटिव्ह टेस्ट आल्यानंतर त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ४० ज्यूनियर आर्टीस्ट व इतर अक्षय कुमारची मेकअप टीम व त्याचे सहाय्यक यांचा समावेश आहे. 'राम सेतू'चे शूटिंग अनिश्चित काळासाठी थांबविण्यात आले आहे.