मुंबई - 'सिंघम' आणि 'दबंग'नंतर बॉलिवूडमध्ये पोलिसांच्या भूमिका असलेल्या चित्रपटांना विशेष पसंती मिळताना दिसत आहे. रणवीरच्या 'सिंबा' पाठोपाठ आता अभिनेता आफताबही लवकरच आदित्य सिंग या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याने पोलिसाच्या वेशभूषेतील आपला एक फोटो शेअर केला आहे.
आफताबचा हा लूक त्याच्या आगामी 'सेटर्स' या चित्रपटासाठी आहे. या चित्रपटातून तो बऱ्याच दिवसांनी बॉलिवूड वापसी करणार असल्याने त्याच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट नक्कीच खास असणार आहे. एकटेपणात एक शक्ती आहे. या शक्तीला फार कमी लोक सांभाळू शकतात, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.
सेटर्स चित्रपट शिक्षण जगतातील माफियांवर आधारीत असणार असून आफताब या सर्वाविरोधात लढताना चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट मे महिन्यात ३ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.