नवी दिल्ली -मुझफ्फरपूर सीजेएम न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दाखल केलेली तक्रार मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर असल्याचे सांगून फेटाळून लावली होती. या निर्णयाला ज्येष्ठ वकील सुधीर ओझा यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात आव्हान दिले आहे. 18 ऑगस्टला याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
मुझफ्फरपूर सीजेएम न्यायालयात वकील सुधीर ओझा यांनी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात फिर्याद दाखल केली होती. त्यामध्ये अभिनेता सलमान खान, रिया चक्रवर्ती आणि मुंबईच्या चित्रपटसृष्टीशी संबंधित काही दिग्गज दिग्दर्शकांवर आरोप केले होते. मात्र, ही फिर्याद न्यायालयीन क्षेत्राबाहेर असल्याचे सांगून 8 जुलै रोजी फेटाळून लावली होती.
सलमान, करण जोहर यांच्यासह 8 जणांविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस राज्य सरकारने केली आहे. अशा परिस्थितीत सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांच्यानंतर आता जेडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी हे प्रकरणी सीबीआयला लवकरच सोपवावे, असे म्हटले आहे.
मुंबई पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न -
बिहारच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले असून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, दिवंगत अभिनेत्यास न्याय देण्यात त्यांना रस नाही, असे मुंबई पोलिसांच्या कारभारावरून दिसून येत आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, असे राजीव रंजन म्हणाले.