मुंबई- ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे आज निधन झाले, आणि बॉलिवूडला सलग दुसरा धक्का बसला. कालच अभिनेता इरफान खान याचेही कॅन्सरमुळे निधन झाले होते. या दोन दिग्गजांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत अभिनेत्री अश्विनी भावे यांनी दुः ख व्यक्त केले आहे. हीना या भावे यांच्या पहिल्या चित्रपटामध्ये त्यांनी ऋषी कपूर यांच्यासह काम केले होते. यासोबतच हनीमून आणि मोहब्बत की आरजू या चित्रपटांमध्येही त्यांनी ऋषी कपूर यांच्यासह काम केले होते.
ऋषी कपूर यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच आत्मविश्वास वाढला - अश्विनी भावे "हीना चित्रपटाच्या वेळी ऋषी कपूर यांच्याकडून मिळालेला स्नेह आणि मार्गदर्शन यामुळेच माझा आत्मविश्वास उंचावला. याबद्दल मी त्यांची कायम आभारी असेल. त्यांच्यासह काम करण्यापूर्वीपासूनच मी त्यांची चाहती होते. इतरांप्रमाणेच ते माझेदेखील चॉकलेट हीरो होते. मला त्यांचे सर्व चित्रपट, त्यांच्या सर्व डान्स स्टेप्स, त्यांचे पुल-ओवर टी-शर्ट आणि स्वेटर अजूनही आठवतात. त्यांचे असे अचानक आपल्यातून निघून जाणे हे खूप वेदनादायी आहे. या दुः खातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य कपूर कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना मी करते." अशा शब्दांमध्ये भावे यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
हेही वाचा :ऋषी कपूर यांचे चित्रपट पाहून मी लहानाचा मोठा झालो - रवी किशन