मुंबई - आपल्या सहज सुंदर अभिनयाने व्यक्तीरेखा जिवंत करणारा अभिनेता इरफान खान यांचे मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाल्याच्या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. इरफान गेल्या दोन वर्षांपासून न्यूरो इंडोक्राईन ट्युमरने आजारी होते. त्यांच्यावर उपचारानंतर ते अलिकडेच भारतात परतले होते. गेल्या काही दिवसापासून ते भारतात डॉक्टरांच्या निगराणीखाली वावरत होते. काल त्यांची अचानक तब्येत बिघडली. देशभरात लॉकडाऊन सूरु असल्याने त्याच्या दैनंदिन उपचारामध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्याने अधिक दक्षता घेण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या उपचारा दरम्यान त्यांना मृत्यूने गाठले.
गेल्याच आठवड्यात त्यांना मातृशोक झाला होता. गेल्या आठवड्यात शनिवारी त्यांची आई सईदा बेगम यांचं निधन झालं. मात्र लॉकडाऊन मुळे इरफान आईच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकले नव्हते. हे शल्य त्यांच्या मनात कायम राहिले. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आपल्या आईच अंत्यदर्शन घेतलं.
इरफान खान गेली दोन वर्षे न्यूरो इंडोक्राईन ट्युमर या आजाराने त्रस्त होते. यासाठी त्यांच्यावर लंडनमध्ये इलाज सुरू होता. यातून ते बरे झाले. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्यांनी 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट स्वीकारला होता. याचे काही शूटींगही पार पडले होते. हा चित्रपट पूर्ण होणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात असतानाच त्यांनी आजारातून उठल्यानंतर कंबर कसली आणि लंडनमध्ये पुढील शूटींगला सुरूवात केली. त्यानंतरच ते मायदेशी परतले होते.
गेली दोन वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर राहिलेल्या इरफान यांना पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. ठरल्या प्रमाणे 'अंग्रेजी मीडियम' थिएटरमध्ये रिलीज झाला. दरम्यान कोरोना व्हायरसाचा संक्रमणाचा काळ सुरू झाला होता. त्यामुळे भारतात लॉकडाऊन करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. त्यामुळे थिएटरमध्ये लागलेला अंग्रेजी मीडियम लोकांना पाहताच आला नाही. अखेरीस ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता.
जीवन परिचय
इरफान खान यांचा जन्म राजस्थानातील जयपूर येथे सामान्य कुटुंबात ७ जानेवारी १९६७ मध्ये झाला. अभिनयाची आवड असलेल्या इरफान यांनी अनेक नाटकातून अभिनय सादर केल्यानंतर दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. त्यांनी अनेक नाटकांसोबतच हिंदी, इंग्रजी सिनेमाधूनही अभिनय केला. ए माइटी हार्ट, स्लमडॉग मिलियनेयर आणि द अमेजिंग स्पाइडर मॅन या हॉलिवूड चित्रपटात ते झळकले. सुमारे ७० चित्रपटातून त्यांनी अभिनय केला. 'लाइफ इन अ मेट्रो', 'पानसिंग तोमर', 'द लंचबॉक्स', 'हैदर', 'गुंडे', 'पिकू', 'तलवार', 'हिंदी मीडियम' यांसारख्या चित्रपटांमध्ये इरफानने दमदार भूमिका साकारल्या होत्या. अंग्रेजी मीडियम हा चित्रपट त्यांच्या अखेरचा चित्रपट ठरला.
इरफान खान यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २००८ मध्ये 'लाइफ इन अ... मेट्रो' या चित्रपटासाठी त्यांची निवड फिल्मफेअर पुरस्कारासाठी झाली होती. २००४ मध्ये त्यांनी 'हासिल' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कारही मिळवला होता. २०११ मध्ये त्यांना भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.