मुंबई - आमिर खान सध्या त्याच्या पूर्ण टीमसोबत दिल्लीमध्ये ‘लाल सिंग चढ्ढा’ या सिनेमाचं शुटिंग करतो आहे. याच शुटिंग दरम्यान त्याला त्याने दिलेल्या एका जुन्या प्रॉमिसची आठवण ठेवून आपल्या संपूर्ण टीमला काही निर्देश दिले आहेत. आपल्या सिनेमाच्या संपूर्ण दिल्ली शूटिंग दरम्यान त्याने दिल्लीत महिलांकडून चालवल्या जाणाऱ्या ‘सखा टॅक्सी सर्व्हिस’ याच कंपनीची सेवा घेण्याची सक्ती केली आहे.
झालं असं, की काही वर्षांपूर्वी आमिरने ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात दिल्लीत सुरू असलेल्या या ‘सखा टॅक्सी सर्व्हिस’ची माहिती प्रेक्षकांना दिली होती. घरगुती हिंसाचार आणि अन्य कारणांनी त्रस्त असलेल्या महिलांना हक्काचं रोजगाराचं साधन मिळावे यासाठी दिल्लीतील एका सामाजिक संस्थेद्वारा ही टॅक्सी सर्व्हिस चालवली जाते. तेव्हापासून कायमच आमिरने त्याला शक्य तेवढी सगळी मदत या संस्थेला करण्याचा निश्चिय केला होता. त्यावेळी त्याने या संस्थेला आपण जेंव्हाही दिल्लीत येऊ कायम याच संस्थेच्या टॅक्सी सेवेचा वापर करू असं आश्वासन दिलेलं होतं. आताच नाही तर गेली दहा वर्ष आमिरने या संस्थेला दिलेलं आपलं प्रॉमिस कायम पाळलं आहे.