मुंबई - मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाऊ फैजल खान आता दिग्दर्शक बनला असून त्याचा 'फॅक्टरी' हा सिनेमा रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. 3 सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात त्याची मुख्य भूमिकाही आहे. एम अँड एस एंटरटेन्मेंट फिल्म, फ्लेमिंगो फिल्म आणि गौरी फिल्म 'फॅक्टरी'चे निर्माता आहेत.
आमिर खानचा 'सख्खा' भाऊ 'फैजल'ची नवी 'परीक्षा'!!
फैजला खानच्या 'फॅक्टरी' या आगामी सिनेमाचा टिझर आता रिलीज झालाय. 28 सेकंदाचा हा टिझर असून सिनेमाबद्दलची उत्कंठा वाढवण्यात हा टिझर फारसा प्रभावी वाटत नाही. तसाही फैजल हा अभिनेता म्हणून अपयशीच ठरला आहे. फ्लॉप अभिनेता ही बिरुदावली तो पुसून टाकणार आहे की फ्लॉप अभिनेत्यासोबतच फ्लॉप दिग्दर्शक अशी नवी बिरुदावली तो मिरवणार आहे हे येता काळच ठरवेल.
गायक फैजल खान
'फॅक्टरी' या सिनेमात एक रोमँटिक गाणेही फैजलने गायले आहे. कलाकाराला प्रत्येक गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे असे त्याचे गायनाबद्दलचे मत आहे. आपण गायन करणार असल्याचे आमिरला सांगताच त्याने सदिच्छा दिल्याचे तो म्हणाला.
फैजल खानच्या कुटुबांची फिल्मी पार्श्वभूमी
फैजल खान हा निर्माता ताहिर हुसेन यांचा मुलगा आहे व मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा सख्खा भाऊ आहे. निर्माते नासिर हुसेन हे त्यांचे चुलते आहेत. अभिनेता इम्रान खान हा आमिर आणि फैजलाचा भाचा आहे
फैजलचे करियर
1969 मध्ये 'प्यार का मौसम' या सिनेमात वयाच्या तिसऱ्या वर्षी बालकलाकार म्हणून काम केले होते. आमिर खानच्या पदार्पणाच्या 'कयामत से कयामत तक' सिनेमातही त्याने छोटी भूमिका केली होती. 'तुम मेरे हिरो' या आमिर खानची भूमिका असलेल्या सिनेमात त्याने वडिलांसोबत सह दिग्दर्शक म्हणून काम केले होते. 1994 मध्ये त्याने नायक म्हणून 'मदहोश' सिनेमात काम केले. विक्रम भट्ट यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. पाच वर्षे सिनेमापासून लांब राहिल्यानंतर त्याने 2000 मध्ये 'मेला' या सिनेमातून पडद्यावर पुनरागमन केले. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला. सध्या त्याने 'डेंजर' या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे आणि आता त्याच्या 'फॅक्टरी' सिनेमाचा टिझर रिलीज झालाय.
आमिर खान आणि फैजल खानचे नाते
एका मुलाखतीच्या दरम्यान फैजलने हे कबुल केले होते की त्याच्यात आणि आमिरमध्ये फारसे सख्य नाही. फैजलचा 'चिनार' हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज होणार होता. त्यावेळी प्रमोशनसाठी आलेल्या फैजलला हा प्रश्न विचारण्यात आला होता. 'चिनार'मध्ये सुरुवातीला निर्मात्यांनी आमिर खानचे आभार मानले होते. त्यालाही फैजलने आक्षेप घेतला होता. कारण यात आमिरचा कोणताही हस्तक्षेप किंवा मदत नव्हती. ही चीप पब्लिसिटी असल्याचे आमिर म्हणाला होता.
फैजल खानवर फ्लॉपचा शिक्का
'मदहोश' हा त्याचा पहिला नायक म्हणून सिनेमा होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता. या सिनेमात आपण बरे काम केले नव्हते असे फैजलने कबुल केले होते. त्यानंतर काम मिळणे बंद झाले. कलाकारांना नेहमी चांगल्या निर्मात्यांचा शोध असतो. 'मेला' हा सिनेमाही त्याने आमिर खानसोबत केला परंतु हा सिनेमाही फ्लॉप ठरला होता. त्यानंतर त्याला काम मिळणे बंद झाले. मग त्याने ठरवले की मोठे सिनेमा मिळणे कठीण आहे. त्यामुळे छोटे छोटे रोल करीत राहायचे. 'काबू' आणि 'बस्ती' हे असे सिनेमे होते की जे चालले पण निर्मात्यांनी त्याचा गाजावाजा केला नाही.
हेही वाचा - इंडियन आयडॉलची दुसरी रनरअप 'सायली कांबळे' कोण आहे?