पूर्वी हिंदी चित्रपटातील हिरो एकाचवेळी चार-चार, पाच-पाच चित्रपटांत काम करायचे. त्यावेळी ते अभिमानाने सांगायचे की ‘मी तीन शिफ्ट्स मध्ये, तीन-चार चित्रपटांमध्ये काम करतोय’. परंतु आताच्या काळात अभिनेते-अभिनेत्री एकावेळी एकाच चित्रपटात काम करताना दिसतात. खरंतर फार वर्षांपूर्वीपासून आमिर खानने नेहमीच एकावेळी एकच चित्रपट हा मंत्र अंगिकारला होता तेव्हा फिल्म इंडस्ट्रीने त्याला वेड्यात काढले होते. आता अख्खे बॉलिवूड त्याचा ‘एकावेळी एकच चित्रपट’ हे ब्रीद वापरतेय. आमिर खानने नेहमीच उत्तम कथानकांना प्राध्यान्य दिले. ‘मेरे पिताजी हमेशा कहाँ करते थे, अगर तुम्हारी कहानी अच्छी है तो तुमको घबरानेकी जरुरत नहीं’, असे आमिरचेने सांगितले.
आमिर खान च्या ‘लगान’ ला २० वर्षे पूर्ण झालीयेत आणि त्यासंदर्भात गप्पा मारताना त्याने आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदमला वरील गोष्ट सांगितली. तो पुढे म्हणाला की, ‘आशू (आशुतोष गोवारीकर) ने मला एक ‘वन-लाईन’ ऐकविली होती. ब्रिटिश राज्यांत एका गावातील लोक शेतसारा (हिंदीत लगान) देऊ शकत नव्हते तेव्हा एका गर्विष्ठ गोऱ्या अधिकाऱ्याने त्यांच्यासोबत पैज लावली की क्रिकेट मॅचमध्ये त्याच्या टीमला जर त्यांनी हरविले तर पुढच्या तीन वर्षांचा लगान माफ केला जाईल अन्यथा त्यांना ‘दुगना लगान देना पडेगा’. (हा डायलॉग ब्रिटिश ऍक्सेंटमध्ये बोलत. खरंतर एव्हाना हा एक जोकही झालाय) (आमिरने विलायती कलाकाराच्या ढंगात तो बोलूनही दाखविला). मला खरंतर ती ‘वन लाईन’ आवडली नाही आणि मी आशूला सांगितले की तूही यावर वेळ खर्च करू नकोस. साधारण तीनेक महिन्यांनी मला त्याचा फोन आला आणि त्याने मला कथा ऐकण्याची गळ घातली. मी तेव्हा त्याला असेही सांगितले की जर का ती ब्रिटिश-गावकरी गोष्ट असेल तर मला इंटरेस्ट नाहीये. परंतु त्याने ‘एकदा ऐक तरी’ असे सांगितल्यावर मी नाखुषीनेच तयार झालो.’
आमिरने पुढे सांगितले, ‘आशू ने मला ते कथानक ऐकविले आणि मी अचंबित झालो. अत्यंत प्रभावी कथानक होते आणि मला आवडलेही. परंतु याचा आवाका मोठा होता आणि चित्रपट खर्चिक आहे हे दिसत होते. मी आशूला सांगितले की ‘मी करायला तयार आहे परंतु आधी निर्माता शोध. आणि हो, कोणाही निर्मात्याला हा चित्रपट मी करतोय असे सांगू नकोस कारण मग कदाचित तो माझ्या नावामुळे निर्मितीसाठी तयार होईल.’ आशू निर्मात्याच्या शोधात फिरू लागला. मी दर तीनेक महिन्यांनी त्याची खबरबात घ्यायचो परंतु कुठलाही निर्माता तयार होत नव्हता. मी आणि आशू भेटलो की मी पुन्हा एकदा त्याला ‘नॅरेशन’ द्यायला सांगायचो. मला बघायचे होते की पुन्हा पुन्हा ऐकूनही मला स्क्रिप्ट तेव्हडीच आवडते का?’