मुंबई - सुपरस्टार आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसने मंगळवारी त्यांच्यावर प्रदूर्षण केल्याच्या आरोपाला उत्तर दिले आहे. लदाखमधील वाखा गावात 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाचे शुटिंग नुकतेच पार पडले होते. शुटिंग संपल्यानंतर परिसर स्वच्छ न केल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो दावा प्रॉडक्शन हाऊसने फेटाळून लावला आहे. सध्या आमिर खान लदाखमध्ये अद्वैत चंदन दिग्दर्शन करीत असलेल्या 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाचे शुटिंग करीत आहे.
लदाखच्या वाखा गावातील जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये प्लास्टिकचा कचरा दिसत होता. युजरचा असा दावा होता की याच ठिकाणी आमिर खानच्या सिनेमाच्या क्रूने शुटिंग केले होते.
आमिर खान प्रॉडक्शनच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या निवेदनात टीमने हा आरोप फेटाळून लावला आणि असे लिहिले आहे की शुटिंगची ठिकाणांची पडताळणी अधिकारी करु शकतात. "अशा अफवा आहेत की आम्ही जिथे शूट केले तो परिसर आम्ही स्वच्छ केला नाही. हा आरोप आम्ही पूर्णपणे खोडून काढत आहोत. आमचे लोकेशन स्थानिक अधिकाऱ्यांसाठी नेहमीच कधीही तपासणी करण्यासाठी खुले असते." असे प्रॉडक्शन हाऊसने प्रसिध्द करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.