सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटाला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई या सिनेमाने केली होती. आता या चित्रपटाचा सीक्वेल येणार असल्याची चर्चा फिल्म इंडस्ट्रीमध्ये रंगू लागली आहे. अलिकडेच सलमानचा 'राधे' हा सिनेमा ओटीटीसह सर्व डिजीटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. हा सिनेमा सलमानच्या चाहत्यांना जरी आवडला असला तरी त्याचे वडील सलीम खान यांना अजिबात आवडला नव्हता. सलीम खान यांनी याहून 'बजरंगी भाईजान' जास्त चांगला होता, असे म्हटले होते आणि आता या चित्रपटाच्या सीक्वेलची चर्चा सुरू झाली आहे.
'बजरंगी भाईजान' सिनेमामध्ये सलमान खान,करीना कपूर खान,नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बाल कलाकार म्हणून हर्षाली मल्होत्रा हिने भूमिका साकारल्या होत्या. यात हर्षालीने साकारलेल्या मुक्या मुन्नीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात राहिली. पाकिस्तानातून चुकुन भारतात आलीली ही मुन्नी बजरंगी भाईजान सलमानला भेटते. या मुलीला परत तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रण हा भाईजान करतो आणि पार पाडतो अशी याची कथा होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूप पसंत केले होते.