मुंबई- २०२० हे वर्ष बॉलिवूडसाठी कॅलेंडरमधील सर्वात दुर्दैवी वर्ष मानावे लागेल. नवीन वर्षाची सुरूवात झाली आणि अनेक नवे संकल्प घेऊन निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ यांनी नव्या दमाने सुरूवात केली. त्याचवेळी कोरोनाचे संकट जगभर सुरू झाले आणि भारतात लॉकडाऊन सुरू झाले. याचा सर्वात मोठा फटका बॉलिवूडला बसलाय. शेकडो निर्माणाधिन चित्रपटांचे सुटिंग थांबले, नव्या घोषणाथांबल्या, तयार चित्रपटांना थिएटर्स नाहीत, नवी पदार्पणे थांबली. अशी मोठी संकटे असतानाच रुपेरी पडद्यावर अजरामर कलाकृती निर्माण करणाचे दिग्गज प्रतिभावंत आपल्याला कायमचे सोडून गेले. आपण अशा कलाकारांचे स्मरण करुयात आणि त्यांना श्रध्दांजलीही वाहूयात.
सौमित्र चटर्जी
प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यामुळे सौमित्र चटर्जी यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. निर्माते-दिग्दर्शक सत्यजीत रे यांचे ते आवडते अभिनेते म्हणून ओळखले जात होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सत्यजीत रे यांच्या 'अपुर संसार' या सिनेमातून त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. सौमित्र चटर्जी यांना चित्रपटसृष्टीतील आपल्या योगदानासाठी २००४ साली पद्मभूषण तर २०१२ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
इरफान खान
आपल्या सहज सुंदर अभिनयाने व्यक्तीरेखा जिवंत करणारा अभिनेता इरफान खान यांच्या निधन झाल्याच्या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. इरफान गेल्या दोन वर्षांपासून न्यूरो इंडोक्राईन ट्युमरने आजारी होते. त्यांच्यावर उपचारानंतर ते अलिकडेच भारतात परतले होते. गेल्या काही दिवसापासून ते भारतात डॉक्टरांच्या निगराणीखाली वावरत होते. देशभरात लॉकडाऊन सूरु असल्याने त्याच्या दैनंदिन उपचारामध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्याने अधिक दक्षता घेण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या उपचारा दरम्यान त्यांना मृत्यूने गाठले.
गेली दोन वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर राहिलेल्या इरफान यांना पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. ठरल्या प्रमाणे 'अंग्रेजी मीडियम' थिएटरमध्ये रिलीज झाला. दरम्यान कोरोना व्हायरसाचा संक्रमणाचा काळ सुरू झाला होता. त्यामुळे भारतात लॉकडाऊन करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. त्यामुळे थिएटरमध्ये लागलेला अंग्रेजी मीडियम लोकांना पाहताच आला नाही. अखेरीस ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता.
त्यांनी अनेक नाटकांसोबतच हिंदी, इंग्रजी सिनेमाधूनही अभिनय केला. ए माइटी हार्ट, स्लमडॉग मिलियनेयर आणि द अमेजिंग स्पाइडर मॅन या हॉलिवूड चित्रपटात ते झळकले. सुमारे ७० चित्रपटातून त्यांनी अभिनय केला. 'लाइफ इन अ मेट्रो', 'पानसिंग तोमर', 'द लंचबॉक्स', 'हैदर', 'गुंडे', 'पिकू', 'तलवार', 'हिंदी मीडियम' यांसारख्या चित्रपटांमध्ये इरफानने दमदार भूमिका साकारल्या होत्या. अंग्रेजी मीडियम हा चित्रपट त्यांच्या अखेरचा चित्रपट ठरला.
इरफान खान यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २००८ मध्ये 'लाइफ इन अ... मेट्रो' या चित्रपटासाठी त्यांची निवड फिल्मफेअर पुरस्कारासाठी झाली होती. २००४ मध्ये त्यांनी 'हासिल' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कारही मिळवला होता. २०११ मध्ये त्यांना भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
ऋषि कपूर
अभिनेता इरफान यांच्या निधनाने सिनेजगतात शोककळा पसरली होती. त्यांच्यापाठोपाठ आता ऋषी कपूर यांचेही निधन झाल्याने सिनेसृष्टीला धक्का बसला.ऋषी कपूर यांनी १९७४ साली 'बॉबी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेत्याच्या रुपात एन्ट्री घेतली होती. त्यापूर्वी 'मेरा नाम जोकर' या चित्रपटातून बालपणीच त्यांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती.त्यांची पहिली वहिली मुख्य भूमिका असलेल्या 'बॉबी' चित्रपटानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.त्यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये 'दामिनी', 'दो दुनी चार', 'कर्ज', 'प्रेमरोग', 'चांदनी', 'यादों की बारात', 'प्रेम ग्रंथ', 'पटियाला हॉउस', 'अग्निपथ', 'कपूर अँड सन्स' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.ऋषी कपूर यांनी 'खुल्लम खुल्ला' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.ऋषी कपूर यांना २०१८ साली पहिल्यांदा कर्करोग असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर जवळपास ८ महिने न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ऋषी कपूर किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही या आजाराबाबत खुलासा केला नव्हता. नंतर त्यांनी स्वत: आपल्या चाहत्यांना या आजाराबाबत माहिती दिली होती. ऋषी कपूर यांना कर्करोगाशी संबंधीत समस्या होती. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. बुधवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील एनएच रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सुशांत सिंह राजपूत
यावर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवले.
सुशांतचा जन्म बिहारच्या पाटण्यात २१ जानेवारी १९८६ झाला. सुशांतने मॅकेनिकल इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण केले होते. सुशांत सिंह राजपूतने त्याच्या करीअरची सुरुवात 'किस देश मे है मेरा दिल' या मालिकेतून केली. मात्र, 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून सुशांत घराघरात पोहोचला. ती मालिका अर्ध्यावर सोडून सुशांतने त्याची पावले मोठ्या पडद्याकडे वळवली. सुशांतने 'कायपो चे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने शुद्ध देसी रोमांस, पीके, धोनी द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, सोनचिढीया आणि छिछोरे यासारख्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. ओटीटीवर रिलीज झालेला दिल बेचारा हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.
वाजिद खान
बॉलिवूडची प्रसिद्ध साजिद-वाजिद जोडी इंडस्ट्रीमधील संगीतासाठी प्रसिद्ध होती. पण १ जून रोजी ही जोडी फुटली. आपल्या मृत्यूच्या काही दिवस आधी वाजीद यांना मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले होते. याचा संसर्ग झाल्याचे सांगितले जाते. परंतु मीडियातील काही घटकांना त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे वाटते.
बासु चटर्जी