मुंबई- बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ब्लॉकबस्टर रोमँटिक 'मोहब्बतें' या चित्रपटाला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत.
चित्रपटाच्या प्रदर्शनाला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमिताभ यांनी एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये बच्चन यांनी लिहिलंय, "परंपरा, प्रतिष्ठा, शिस्त ... 'मोहब्बतें' अनेक कारणांसाठी खास आहे ... 20 वर्षांची ही सुंदर प्रेमकथा, भाव भावनांचा एक रोलर कोस्टर. ज्यांनी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता त्यांना आमचे भरपूर प्रेम."
व्हिडिओशिवाय अमिताभ यांनी एक फोटो शेअर केला आहे. यासह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, "या चित्रपटाचे संगीत हा एक खजिना आहे ... गीत, रचना, प्रत्येक गाणे अपवादात्मकरित्या बनवले गेले आहे... या चित्रपटाचा एक भाग असल्याचा आनंद झाला आहे."
या चित्रपटाच्या गाण्यांच्या कोरिओग्राफीमध्ये फराह खान यांनी खूप परिश्रम घेतले होते. या चित्रपटाची गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती आणि संगीत जतीन ललित यांनी दिले होते. या चित्रपटाला लता मंगेशकर, उदित नारायण यांच्यासह अनेक उदयोन्मुख गायकांनी आवाज दिला होता. संगीत खूप हिट झाले.
शाहरुखला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अमिताभ यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता. फराहा यांच्यासाठी हा सिनेमा त्यांच्या कारकिर्दीचा एक महत्त्वाचा भाग आहे.