सॅन फ्रान्सिस्को : टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क अडचणीत येण्याची शक्यता आहे. एक्स मॉडेल कारमध्ये सीट बेल्टमध्ये अनेक त्रुटी असल्याची तक्रारी अनेक ग्राहकांकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे यूएस नॅशनल हायवे ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशनकडून (NHTSA) टेस्लाची चौकशी सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक ग्राहकांनी आपल्या टेस्लाच्या सीट बेल्टमध्ये त्रुटी असल्याच्या तक्रारी यूएस नॅशनल हायवे ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशनकडे केल्या होत्या.
टेस्लाच्या मॉडेल एक्समध्ये आहेत तक्रारी :टेस्लाने 2022 आणि 2023 मध्ये बनवलेल्या टेस्ला मॉडेल एक्स या कारच्या सीट बेल्टमध्ये अनेक त्रुटी असल्याचे पुढे आले आहे. ही कार चालवताना समोरील सीट बेल्ट अँकर प्रीटेंशनरशी जोडलेला नसल्याची तक्रार काही ग्राहकांनी दिलr होती. त्याबाबतच्या तक्रारीही ऑफिस ऑफ डिफेक्ट इन्व्हेस्टिगेशन (ODI) ला प्राप्त झाल्या होत्या. सीट बेल्टमध्ये त्रुटी असल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
टेस्लाची 50 हजार कारच्या सीट बेल्टमध्ये असू शकतात त्रुटी :टेस्लाने उत्पादित केलेल्या या नवीन कारमध्ये सीट बेल्टमध्ये त्रुटी असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्याची दखल नॅशनल हायवे ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशनने घेतली आहे. या कार अपर्याप्तपणे जोडलेल्या अँकर लिंकेजसह वितरित करण्यात आल्याचे नॅशनल हायवे ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशनने स्पष्टच केले. सीट बेल्टमध्ये त्रुटी असलेल्या 50 हजार टेस्लाच्या कार प्रभावित होऊ शकत असल्याचा दावा नॅशनल हायवे ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशनने केला आहे.