सॅन फ्रान्सिस्को : ट्विटरचे स्त्रोत कोड लिक झाल्याने ट्विटर वापरकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याबाबत ट्विटरने कबुली दिली असून ट्विटर स्त्रोत कोडचे काही भाग गीत हबवर ऑनलाइन लिक झाले आहेत. मात्र याबाबत ओपन सोर्स कोडिंग प्लॅटफॉर्मवर कॉपीराइट उल्लंघनाची नोटीस पाठवल्याचेही ट्विटरच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ट्विटरने कॅलिफोर्नियातील उत्तर जिल्ह्याच्या जिल्हा न्यायालयात याबाबतची तक्रार दाखल केली आहे. यावेळी गीत हबला कोड शेअर करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासह तो डाउनलोड करणाऱ्या इतर व्यक्तींचीही माहिती देण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे.
ऑनलाइन पोस्ट केला गेला लिक कोड :ट्विटरचा लिक केलेला कोड ऑनलाइन पोस्ट करण्यात आला होता. मात्र हा कोड किती काळ पोस्ट करण्यात आला याबाबत माहिती नसल्याचे ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आले. आता गीत हबने कोड काढून टाकला आहे. उघड केलेला स्त्रोत कोड मस्कच्या ट्विटरसमोरील आव्हानांमध्ये भर घालत असल्याचा दावा माध्यमातून करण्यात येत आहे. तंत्रज्ञान कंपन्या सहसा अशा कोडला जपून ठेवलेले रहस्य म्हणून पाहतात. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना त्याचा फायदा मिळू शकतो. त्यासह कंपनीची सुरक्षितता उघड होऊ शकते या भीतीने ते सामायिक करत नसल्याचेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.